Published On : Fri, Mar 23rd, 2018

रासायनिक कारखान्यांची तपासणी करण्यासाठी भरारी पथकच नाहीत – आमदार हेमंत टकले

मुंबई: एमआयडीसीमधील अनेक उद्योग, कारखाने यांच्या मशीनचे ऑडिट होणे आवश्यक आहे. तसेच त्या मशिनींचे अपग्रेडींग करायला लावले पाहीजे अशी मागणी करतानाच रासायनिक कारखान्यांची तपासणी करण्यासाठी शासनाकडे भरारी पथक नसल्याची बाब आमदार हेमंत टकले यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

दरम्यान या प्रश्नावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रासायनिक कारखान्यांची तपासणी करण्यासाठी पथकं नेमली जातील असे सकारात्मक उत्तर दिले.

राज्यातील एमआयडीसीमधील अनेक रासायनिक कारखाने दुषित व रासायनिक पाणी प्रक्रिया न करताच सोडत असतात. त्यामुळे एमआयडीसी वसाहतीमध्ये स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

यावेळी झालेल्या चर्चेत आमदार हेमंत टकले यांनी सहभाग घेतला आणि सरकारच्या काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. याशिवाय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार प्रकाश गजभिये यांनीही चर्चेत सहभाग घेतला.