नागपूर : नागपूरच्या चर्चित गंगा-जमुना वस्तीमध्ये पुन्हा एकदा चोरीच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. रात्री उशिरा फिरण्यासाठी आलेल्या दोन तरुणांच्या कारचे काच फोडून अज्ञात चोराने रोकड व सोन्याची अंगठी लंपास केली. घटनेच्या गांभीर्याला लक्षात घेता गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करत एका सराईत चोराला अटक केली असून, आरोपीकडून चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी स्वराज मुखर्जी हे अंबाझरी परिसरात राहतात. 10 एप्रिल रोजी रात्री ते आपल्या मित्रासोबत गंगा-जमुना परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यांनी आपली कार बालाजी मंदिराजवळ उभी केली होती आणि जवळच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असताना, अज्ञात चोराने संधी साधून कारचे काच फोडून त्यामधील रोकड व सोन्याची अंगठी चोरी केली.
या प्रकरणाची तक्रार त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात दिली होती. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाला माहिती मिळाली की, आरोपी हिमांशू चिंचूरकर (रा. कलमणा) हा आपल्या दुचाकीवरून गंगाबाई घाट परिसरात फिरत आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली.
तपासात उघड झाले की, हिमांशू यापूर्वीही अनेक वेळा गुन्ह्यांमध्ये अडकलेला असून त्याला तडीपारही करण्यात आले होते. तो गंगा-जमुना परिसरात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमधून काच फोडून मौल्यवान वस्तू चोरण्याचे काम करत असे. त्याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली अंगठी, रोकड व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.