Published On : Wed, Aug 28th, 2019

‘सोशल मीडिया फॅन फेस्ट’मध्ये तरुणाईच्या उत्साहाला उधान

मानकापूर इनडोअर स्टेडियममध्ये जल्लोष

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या माध्यमातून आयोजित इनोव्हेशन पर्व मध्ये आलेल्या संकल्पनांना उद्योगामध्ये परिवर्तीत करण्याच्या दृष्टीने निधी उभारणीसाठी स्वारंभ आणि युवा भारती यांच्या वतीने व नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘सोशल मीडिया फॅन फेस्ट’चे मानकापूर येथील इनडोअर स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आले होते. या ‘सोशल मीडिया फॅन फेस्ट’मध्ये सोशल मीडियाद्वारे तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या स्टार्टच्या सहभागाने इनडोअर स्टेडियममध्ये उपस्थित तरुणाईच्या उत्साहाला चांगलेच उधान आले.

यावेळी ‘इनोव्हेशन पर्व’ची संकल्पना साकारणा-या महापौर नंदा जिचकार, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्वेनर डॉ. प्रशांत कडू, मेयर इनोव्हेशन अवार्डचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते यांच्यासह मनपाचे पदाधिकारी, अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’ हे विदर्भातील तरुणाईसाठी नवी पर्वणीच ठरले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिराज्य गाजविणा-या आपल्या आवडत्या स्टारची झलक पाहण्यासाठीची आतुरता, त्यांच्याकडून मिळणा-या टिप्स, त्यांच्या कविता, गाणी आणि त्यावर धुंद होउन नाचणारी तरुणाई या सर्वांची सांगड मानकापूर येथील इनडोअर स्टेडियममध्ये पाहायला मिळाली.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर त्यामाध्यमातून जनजागृती करता येते. शिवाय त्याचा योग्य वापर करुन त्यामधून करिअरही घडविता येउ शकते. हे सर्व इथे आलेल्या सर्व सोशल मीडियावरील स्टार्सनी दाखवून दिले आहे. त्यामुळे तरुणांनी या कलावंतांपासून प्रेरणा घेउन सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया, एमटीव्ही रोडीज् ची विजेती श्वेता मेहता, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कवितांद्वारे तरुणाईला भुरळ घालणारी पूजा सचदेव, कवी अमनदीप सिंग, फिटनेस एक्सपर्ट ॲनी रे, युट्यूबर रौनक रामटेके, गायिका श्रेया जैन, कवी राकेश तिवारी अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईच्या मनावर राज्य करणा-या व्यक्तींनी सोहळ्यामध्ये चांगलीच रंगत भरली.

सोशल मीडिया हे आजच्या आधुनिक युगातील प्रभावी माध्यम असून ते केवळ संपर्काचे साधन न राहता त्या माध्यमातून आपल्या नवसंकल्पनांच्या पूर्तीसाठी त्याला स्टार्ट अपची जोड द्या व सातत्याने त्यासाठी कार्य करा, पुढील काळ आपलाच आहे, असा मंत्र उपस्थित सुप्रसिद्ध मान्यवरांनी मानकापूर विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये हजारोंच्या संख्येत उपस्थित तरुणाईला दिला.

यावेळी डान्स डिव्होशन क्य्रू तर्फे डान्स तर सिंग्स अनप्लग बॅण्डद्वारे गीतांच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण परिसर दणाणून सोडले. यावेळी उपस्थित तरुणाईने चांगलाच ठेका धरला. एमटीव्ही रोडीज् ची विजेती श्वेता मेहता यांनी उपस्थित तरुणांना मंचावर बोलवत त्यांना काही ‘टास्क’ देत त्यांनाही या सोहळ्यातील अविस्मरणीय क्षणांचे धनी केले. याशिवाय सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी तरुणाईशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना आपल्या हटके स्टाईलने उत्तर दिले. संपूर्ण सोहळ्याचे अनुजा घाडगे यांनी शानदार संचालन केले.