Published On : Sat, Jul 27th, 2019

युवा पिढीने देशरक्षणासाठी कटीबद्ध व्हावे – पालकमंत्री

नागपूर: कारगिल युद्धात भारतीय जवानांनी प्राणांची आहुती देत, परिवाराची चिंता न करता देशाच्या सिमांचे रक्षण केले. मातृभूमीसाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळेच हा देश चौफेर प्रगती करत आहे. त्यामुळे युवा पिढीने केवळ एक दिवसापुरता विजयी दिवस साजरा न करता देशरक्षणासाठी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने सेंट ऊसुला गर्ल्स हायस्कूलच्या सभागृहात ‘कारगिल विजयी दिना’निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे राज्य अध्यक्ष चंद्रशेखर आलेगावकर आणि नागपूर जिल्हा अध्यक्ष संतोष मलेवार उपस्थित होते.

आतापर्यंतच्या अनेक युध्दात भारतीय सैनिकांनी जिवाचे रान करुन देशाचे रक्षण केले आहे. त्यावेळी त्यांनी परिवाराची कधीही चिंता केली नाही. कारण हा देश त्यांच्या परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. त्यांच्या पराक्रमामुळे, साहसामुळे शत्रूराष्ट्रांच्या ऊरात धडकी भरली आहे. सैन्यामुळेच देशाला ताकद मिळाली आहे. त्यांच्यामुळे देशाला प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे देश आज सर्वच क्षेत्रात चौफेर प्रगती करत आहे. सैनिकांनी युध्दांमध्ये विजय मिळवल्यामुळेच देशाचा जगात कणा ताठ आहे. नुकत्याच झालेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने कोणताही शत्रू वा राष्ट्र भारतासोबत आगळीक करणार नाही, असा विश्वास यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

माजी सैनिक संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे नक्कीच पाठपुरावा करु, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने आता शहिदांच्या वारसांना 1 कोटी रुपयांचा सानुग्रह निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 21 व्या शतकातील मजबूत भारताच्या निर्माणासाठी, येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहीजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘अमर जवान ज्योती स्मारका’ला पुष्पचक्र वाहून नमन केले. तसेच सुधाकर तकीत यांना संघटनेच्या वतीने जीवन गौरव, राम कोरके यांना समाजभूषण, लिलावती शेंडे आणि शेवंताबाई मरसकोल्हे यांना स्त्रीशक्ती गौरव देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आलेगावकर यांनी संघटना स्थापन करण्यामागची भूमिका विशद करताना माजी सैनिकांना नागपुरात एक स्वतंत्र सभागृह मिळावे, तसेच माजी सैनिकांच्या राज्य शासनाच्या नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणात थोडी शिथिलता आणावी, अशी मागणी केली. विद्यमान शासनाच्या काळात सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’ मिळाले. तसेच युवा पिढीमध्ये देशप्रेम, देशभक्ती जागृत व्हावी, यासाठी राज्यभरात उरी चित्रपटाच्या मोफत विशेष शोचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले.

यावेळी नागपूरचे अध्यक्ष संतोष मलेवार यांनी प्रास्ताविक केले. तर अजय चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाला वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.