Published On : Sun, Nov 26th, 2017

संविधानामुळे जगात लोकशाही मजबूत : पालकमंत्री बावनकुळे


नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार संविधानामुळे जगात लोकशाही मजबूत झाली आहे. संविधानानेच प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता, सामाजिक न्याय, समान संधी आणि जगण्याचा अधिकार बहाल केला. संविधानाच्या अधीन राहूनच प्रत्येक नागरिकाने आपले वर्तन ठेवले पाहिजे. त्यामुळेच देशाची प्रतिष्ठा अधिक उंचावेल, असे उद्गार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज काढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला सामाजिक न्याय भवन येथे पालकमंत्री बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखवली. याप्रसंगी आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रकाश गजभिये, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, विजय वाकुलकर, दिनेश कोवे उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून उपस्थितांना पालकमंत्र्यांनी शपथ दिली. त्यापूर्वी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला व संविधानाच्या प्रास्ताविकाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सामाजिक न्याय भवनापासून निघालेली संविधान रॅली संविधान चौकात समाप्त झाली. डॉ. आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, राजनगर, संत चोखामेळा मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, डॉ. आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह नांदा येथील विद्यार्थ्यांनी हातात संविधानाच्या प्रास्ताविकेचे फलक घेऊन उपस्थिती दर्शवली.


या रॅलीत व्याख्याने, काव्यस्पर्धा, पथनाट्य, मुशायरा, जलसा आणि दिव्यांग कला स्पर्धेचे आयेजन करण्यात आले. ही रॅली सामाजिक न्यायभवन, दीक्षाभूमी, राहाटे कॉलनी, पंचशील चौक, व्हेरायटी चौक, झिरो माईल चौक ते संविधान चौकापर्यंत काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक संस्था व संघटना या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.