मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासाद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा परीक्षा नियोजन वेळेआधी केले असून, निकाल जाहीर होण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बारावीची परीक्षा यंदा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली. यावर्षी परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दहा दिवस आधी सुरू झाली आणि वेळेत पार पडली. दहावीची परीक्षा देखील २१ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १७ मार्च २०२५ रोजी संपन्न झाली.
परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेच्या चौकटीत पूर्ण केली आहे. सद्यस्थितीत गुणांची पडताळणी जोरात सुरू असून, याच आठवड्यात ती प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर लगेच गुणपत्रकांची छपाई सुरू होणार आहे.
बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल १३ मे २०२५ रोजी ऑनलाइन स्वरूपात जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दहावीचा निकाल १५ किंवा १६ मे २०२५ रोजी प्रसिद्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
निकाल तयार करण्याचे काम ११ मे पर्यंत पूर्ण होईल, अशी खात्रीलायक माहितीही देण्यात आली आहे. निकालाच्या तारखा शिक्षण विभागाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार असून, राज्याचे शिक्षण मंत्री लवकरच याबाबत घोषणा करतील, असे मंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.एकूणच, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रतिक्षेचा कालावधी आता लवकरच संपणार आहे.