Published On : Mon, Aug 26th, 2019

‘व्हॉईस ऑफ विदर्भ’ची अंतिम फेरी १ सप्टेंबरला

Advertisement

तिन्ही गटातून २७ स्पर्धक देणार जेतेपदासाठी झुंज

नागपूर : नागपूर महानगरपालिका, आई कुसुम सहारे फाउंडेशन व लकी म्यूझीकल इंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित ‘व्हॉईस ऑफ विदर्भ’ दुस-या पर्वाच्या अंतिम फेरीसाठी तिन्ही गटातील एकूण २७ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. येत्या १ सप्टेंबरला रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये दुपारी ३ वाजतापासून स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरूवात होईल.

रविवारी (ता.२५) शंकरनगर येथील साई सभागृहामध्ये झालेल्या उपांत्य फेरीला शहरातील संगीत रसिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दर्शविला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनपा क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, प्रतिभा पाटील, राजू शर्मा, मोहम्मद सलीम, संजय पोटदुखे, सुनील गजभिये आदी उपस्थित होते.

सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके, उन्नीक्रिष्णन नायर, शालिनी सिन्हा व विजय शुक्ला यांनी उपांत्य फेरीमध्ये वयोगट ३ ते १५, १६ ते ४० आणि ४१च्या वरील या तिन्ही गटातील स्पर्धेचे परीक्षण केले. तिन्ही गटातून परीक्षकांनी एकूण २७ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. वयोगट ३ ते १५ वर्षे मधून सारिका बोभाटे, आयुष मानकर, आर्ष चवरे, अनुश्री केळकर, श्रावणी खंडाळे, तनिष गजभिये, मृणाल पठाडे व पूर्वा सहारे हे आठ स्पर्धक अंतिम फेरीमध्ये जेतेपदासाठी झुंज देणार आहेत. तर १६ ते ४० या वयोगटातून वासुदेव धाबेकर, भाग्यश्री वाटकर, धनश्री वाटकर, संकेत गोंडाणे, गौरव हजारे, सुरज महातो, उझ्मा शेख, रिदा शेख, पीयूष नक्शे, मनिष बैरीसाल व चेतन आमटे या ११ स्पर्धकांमध्ये ‘व्हॉईस ऑफ विदर्भ’चा खिताब पटकाविण्यासाठी चुरशीचा सामना होईल. ४१ वर्ष व त्यावरील व्यक्तींसाठीच्या वयोगटातून श्याम बापटे, विजय पांडे, शरद आटे, नित्यानंद रेड्डी, अरुण नालगे, चंद्रकांत आंभिकर, प्रकाश देशपांडे व प्रभा घुले या आठ स्पर्धकांमध्ये अंतिम सामना होईल.

उपांत्यफेरीमध्ये तिन्ही गटातील स्पर्धकांच्या एकापेक्षा एक सरस सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी उपांत्यफेरीला पूर्णवेळ उपस्थित राहून स्पर्धकांच्या सादरीकरणाला दाद दिली व त्यांना प्रोत्साहन दिले.

‘व्हॉईस ऑफ विदर्भ’च्या संपूर्ण आयोजनासाठी विजय चिवंडे व मयंक बोरकर विशेष सहकार्य करीत आहेत. १ सप्टेंबरला रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये होणा-या अंतिम फेरीच्या प्रसंगी गतवर्षीची विजेती गायीका स्वस्तिका ठाकूर उपस्थित राहणार आहे. अंतिम फेरीमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणा-या स्पर्धकांना २१ हजार रुपये रोख, दुस-या स्थानावरील स्पर्धकाला ११ हजार रुपये रोख व तृतीय क्रमांक प्राप्त करणा-या स्पर्धकाला ५ हजार रुपये रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

अंतिम फेरीला उपस्थित राहण्यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात आली असून इच्छुकांना रिचा युनिक क्लिनिक गांधीबाग, जी.एम. रोकडे ज्वेलर्स दिघोरी व फुड बक्स धरमपेठ येथून पासेस प्राप्त करता येईल, अशी माहिती आयोजक लकी खान यांनी दिली.