Published On : Mon, Aug 26th, 2019

सप्टेंबरपासून धावणार महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवरील ‘तेजस्विनी बस’

शहीद कुटुंबातील मुलीच्या हस्ते होणार उद्घाटन : चालक, वाहक ते सर्व कर्मचारी महिलाच

नागपूर : महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मनपाच्या ‘आपली बस’च्या ताफ्यात महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवर संचालित ‘तेजस्विनी बस’ लवकरच दाखल होणार असून या बसचे उद्घाटन येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे या बस मधील चालक, वाहक व बस आगारातील कर्मचारीही महिलाच राहणार असून शहीद कुटुंबातील मुलीच्या हस्ते पर्यावरणपूरक ‘तेजस्विनी बस’चे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी दिली.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी (ता.२६) परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समितीचे सदस्य राजेश घोडपागे, नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, नागेश मानकर, सदस्या रूपा रॉय, वैशाली रोहनकर, मनिषा धावडे, अर्चना पाठक, विशाखा बांते, रुपाली ठाकुर, उपायुक्त राजेश माहिते, परिवहन विभागाच्या सहायक आयुक्त किरण बगडे, निगम सचिव हरीश दुबे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे म्हणाले, ‘आपली बस’ सेवेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सुविधा देण्याचा मनपा परिवहन समितीचा प्रयत्न असतो. मागील वर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटमध्ये ५० टक्के सवलत देण्याची योजना राबविण्यात आली. याच श्रृंखलेमध्ये यावर्षी महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवर संचालित ‘तेजस्विनी बस’ सुरू करण्यात येत आहे. इलेक्ट्रिकवरील ‘तेजस्विनी बस’साठी लकडगंज येथे बस आगार तयार करण्यात येत असून या आगारालाही ‘मातृशक्ती बस आगार’ नाव देण्यात आले असल्याचेही परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी सांगितले.

‘एकलव्य’ योजनेद्वारे ५० रुपयात दिवसभर प्रवास

‘आपली बस’ सेवेमध्ये पुन्हा एका नव्या योजनेद्वारे नागरिकांना सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. शहरात विविध कामांसाठी दिवसभर ‘आपली बस’ने फिरणा-यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाही. मनपा परिवहन विभागाच्या ‘एकलव्य’ योजनेद्वारे एकदा ५० रुपयाची पास काढल्यानंतर दिवसभर शहरात कोणत्याही भागामध्ये ‘आपली बस’ने प्रवास करता येणार आहे, असेही परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement