Published On : Fri, Jun 22nd, 2018

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनाने उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू प्रभावित

बारामती: बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील शेती संशोधनाने उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज प्रभावित झाले. कृषी केंद्रातील विविध संशोधन आणि प्रायोगिक प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले.उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज माळेगाव (ता. बारामती) येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. यादरम्यान त्यांनी इंडो-डच सेंटर फॉर व्हेजिटेबल एक्सेलन्स, पशुजनुकीय सुधारणा केंद्र, कृषी विज्ञान केंद्राची प्रशासकीय इमारत अशा विविध ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी केंद्रातील प्रायोगिक प्लॉटवर जाऊन उत्पादन पाहिले.

श्री. नायडू यांचे सकाळी पावणेदहाच्या सुमारास कृषी विज्ञान केंद्र येथे आगमन झाले. त्यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री. नायडू यांनी प्रथम केंद्रातील ग्रीनहाऊसमधील सिमला मिरचीच्या प्लॉटला भेट दिली. केंद्राचे प्रमुख संशोधक सय्यद शाकीर अली यांनी त्यांना मिरचीचे वाण, उत्पादकता व त्यातून मिळणारे उत्पन्न याबाबत माहिती दिली. इंडो-डच सेंटर फॉर व्हेजिटेबल एक्सलन्सच्या माध्यमातून पिकविण्यात येणाऱ्या विविध भाज्यांची उत्पादकता कशी वाढवता येईल, तसेच त्याचा प्रसार केला जाण्यासाठी केंद्राकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती श्री. नायडू यांनी घेतली.

श्री. नायडू यांनी मधुमक्षिका पालन आणि पशुजनुकीय संशोधनाबाबत माहिती घेतली. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांनी संपूर्ण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रकल्पाच्या प्रतिकृतीची पाहणी केली.

त्यानंतर कृषी विज्ञान केंद्रातील सभागृहात राजेंद्र पवार यांनी श्री. नायडू यांचा शाल, बैलगाडीची प्रतिकृती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. रणजित पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचा सत्कार केला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कृषी विज्ञान केंद्राची प्रगती आणि विविध संशोधन व प्रायोगिक प्रकल्पांवर आधारित माहितीपट पाहिला.

यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, शुभांगी पवार, डॉ. लखन सिंग आदी उपस्थित होते

Advertisement
Advertisement