
नागपूर : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षा गैरव्यवहार प्रकरणावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही वर्षांत वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या दशकात देशभरात अनेक स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीस आले. मात्र सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्ट साखळी मोडून काढण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘नीट’ प्रकरणात काँग्रेस नेत्यांची नावे जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. लातूरमधील प्रकरणाचा आधार घेत काहीजण जाणीवपूर्वक काँग्रेसला लक्ष्य करत आहेत. जुनी वक्तव्ये पुढे करून सरकार स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत त्यांनी राहुल गांधी यांनीही या विषयावर सातत्याने आवाज उठवल्याचे नमूद केले.
राज्यातील शेतकरी प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. कर्जमाफीच्या घोषणा करूनही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. डिझेल-पेट्रोल टंचाईमुळे शेतीची कामे अडचणीत आली असून खतांच्या पुरवठ्याबाबतही अनिश्चितता आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी औद्योगिक गुंतवणुकीत घट झाल्याचा दावा केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे उद्योग क्षेत्रातील मोठी गुंतवणूक मागे घेतली गेली असून केंद्र सरकार केवळ प्रसिद्धीपर राजकारण करण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली.
तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी हा देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न असल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, युवकांना धार्मिक वाद नकोत तर रोजगार हवा आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्या तरुणांचे सोशल मीडिया खाते बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी महायुतीत अंतर्गत नाराजी वाढत असल्याचा दावा केला. काही मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता असून आगामी काळात त्याचे परिणाम दिसू शकतात, असे संकेत त्यांनी दिले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास सामाजिक असंतोष वाढू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.








