Published On : Wed, Nov 6th, 2019

युद्धात वापरलेले दोन रणगाडे कस्तुरचंद पार्कला ठेवणार

सेनेद्वारे आलेल्या प्रस्तावाला हेरिटेज समितीची मंजुरी

नागपूर: भारत-पाकिस्तान आणि भारत-चीनमधील युद्धात भारतीय सेनेने वापरलेले दोन विजयंता नामक रणगाडे कस्तुरचंद पार्क येथे ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया या सेनेच्या मुख्यालयामार्फत आलेल्या प्रस्तावाला हेरिटेज समितीने मंजुरी प्रदान केली.

नागपूर महानगरपालिका मुख्यालायत बुधवारी (ता. ६) नागपुरातील हेरिटेज समितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत रणगाड्यांसंदर्भातील प्रस्तावाचा विषय चर्चेला आला होता. समितीने या प्रस्तावाला डॉ.तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने मंजुरी दिली.

बैठकीला हेरिटेज समितीचे सदस्य आणि मनपाचे उपायुक्त राजेश मोहिते, समिती सदस्य सचिव मनपा नगररचना विभागाचे सहायक संचालक (प्रभारी) सुनील दहिकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक सुप्रिया थूल, डॉ.श्रीमती शुभा जोहरी, श्रीमती उज्ज्वला चक्रदेव, प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा, उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया सेना मुख्यालयाचे कर्नल राकेश कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.

भारतीय सेनेच्या उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरियाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. सेनेमार्फत भारतीय युद्धात वापरण्यात आलेले विजयंता नावाचे दोन रणगाडे कस्तुरचंद पार्क येथे विद्यार्थी व पर्यटकांसाठी ठेवण्याबाबतचा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाला हेरिटेज समितीने मंजुरी दिली. या रणगाड्य़ाची देखभाल व दुरूस्ती सेनेद्वारे करण्यात येणार आहे. हे रणगाडे दिल्लीवरून नागपुरात दाखल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी कस्तुरचंद पार्क येथे उत्खननात चार तोफा सापडल्या होत्या. त्या तोफांना पर्यटनासाठी कस्तुरचंद पार्क येथे ठेवण्यात यावे, यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्र पाठविण्यात यावे, असा प्रस्ताव समिती सदस्य अशोक मोखा यांनी मांडला. याविषयालाही हेरिटेज समितीने मंजुरी प्रदान केली.

नागपूर मेट्रो रेल्वेमार्फत झिरो माईल येथे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव समितीला सादर करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज बैठकीमध्ये मेट्रोद्वारे सादरीकरण करण्यात आले. प्रस्तावामध्ये काही त्रुटी असल्याने सुधारित प्रस्ताव पुढील बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा, असे निर्देश समितीने दिले.