Published On : Wed, Nov 6th, 2019

सिमेंट रस्ते बांधकामाच्या कामाला गती द्या : महापौर नंदा जिचकार

सिमेंट रस्ते पाहणीत अधिकारी, कंत्राटदारांना निर्देश

नागपूर: शहरामध्ये सर्वत्र सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही काम पूर्ण झाले नाही. काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण होउन अनेक महिने होउनही दुस-या बाजूच्या कामाला सुरूवात झाली नाही. ब-याच ठिकाणी तयार रस्त्यांवरून वाहणा-या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थाच करण्यात आली नाही तर काही ठिकाणी झाडांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली नाही. या सर्व त्रुट्या लवकरात लवकर पूर्ण करुन उर्वरित सिमेंट रस्त्यांच्या कामाला गती देउन तातडीने पूर्णत्वास न्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

शहरात सुरू असलेल्या सिमेंट रोड बांधकाम कार्याची बुधवारी (ता.६) महापौर नंदा जिचकार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना निर्देश दिले. बुधवारी (ता.६) महापौरांनी मंगळवारी व आसीनगर झोन अंतर्गत भागातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सर्वश्री अमीन अख्तर, रामचंद्र खोत, गिरीश वासनिक, मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्‍हाण, उपअभियंता दिलीप बिसेन, उपअभियंता सुनील उईके, कनिष्ठ अभियंता रवी मांगे यांच्यासह संबंधित सिमेंट रस्त्यांचे बांधकाम कार्य करणारे कंत्राटदार उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी मनपा मुख्यालयापुढील विधानभवन ते व्‍हीसीए, पोलिस तलावापुढील मार्ग, सादीकाबाद टी-पॉईंट ते दिनशॉ मार्ग, बोरगाव चौक, जरीपटका ख्रिश्चन कब्रस्तान समोरील मार्ग, दयालू सोसायटी जरीपटका, बॉम्बे स्कूटर ते एकता पॅलेस मार्ग, टेका नाका नारा रोड आदी मार्गांच्या कामाची पाहणी केली.

पाहणी दौ-यामध्ये सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालयापुढील विधानभवन ते व्‍हीसीए मार्गाच्या कामावर महापौरांनी नाराजी दर्शविली. या मार्गावरील एका बाजूचे सिमेंटचे बांधकाम पूर्ण होउन अनेक दिवस झाले मात्र अद्यापही दुस-या बाजूच्या बांधकामाला सुरूवात झाली नाही. याबाबत आढावा घेत येत्या दोन दिवसात या मार्गावरील दुस-या बाजूचे सिमेंट बांधकाम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय पोलिस तलाव समोरील गोधनीकडे जाणा-या मार्गाचेही एकाच बाजूचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर गांभीर्याने दखल घेत अधिका-यांनी स्वत: लक्ष देउन संबंधित कंत्राटदाराकडून कामाची गती वाढवून तातडीने या मार्गाचे बांधकाम पूर्ण करून घ्यावे. तसेच सादीकाबाद टी-पॉईंट ते दिनशॉ येथीलही एकाच बाजूचा रस्ता तयार करण्यात आला असून दुस-या बाजूच्या कामाला लवकर सुरूवात करणे आणि तयार सिमेंट रस्त्याच्या बाजूला असलेल्या आयब्लॉक्स समांतर नसल्याने त्याचे समतलीकरण करण्याचेही निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

जरीपटका येथील ख्रिश्चन कब्रस्तान समोरील एका बाजूने सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे तसेच दुस-या बाजूचेही काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील आवश्यक दुरुस्त्या त्वरीत करून मार्ग दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा. या मार्गावर फुटपाथचे बांधकाम बाकी असून हे बांधकाम करताना पाण्याचा निचरा व्हावा यासाठी विशेष लक्ष देणे व झाडांसाठीही काही अंतरावर जागा ठेवण्यात यावी, असेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देश दिले. जरीपटका येथील दयालू सोसायटी सीएमपीडीआय मार्गावर ओसीडब्ल्यू, गडर लाईन, केबल लाईनचे चेम्बर तुटल्याने खड्डे तयार झाले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षा कठडे लावून चेम्बर तयार करून लवकरात लवकर रस्ता दुरूस्त करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

बॉम्बे स्कूटर्स ते एकता पॅलेस मार्गावर ठिकठिकाणी झाडांसाठी सिमेंटची कठडे करण्यात आली आहेत. मात्र काही घरांच्या पुढेच कठडे करण्यात आल्याने वाहन पार्कींगला अडथळा निर्माण होत असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसत आहे. याउलट जवळच असलेल्या झाडांना कोणत्याही प्रकारचे कठडे करण्यात आले नाहीत. याबाबत संबंधित कंत्राटदारांनी घरांपुढील कठडे काढून झाडांना संरक्षण कठडे तयार करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. टेका नाका नारा रोडवर बीएसनएल लाईनच्या चेम्बरमुळे रस्त्यावर खड्डा निर्माण झाला आहे. संबंधित विभागाच्या कार्यवाहीची वाट न पाहता नारिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपातर्फे चेम्बर वर करून रस्ता समतल करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

सिमेंट रस्त्यांच्या बांधकामासह फुटपाथकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पायी चालणा-या नागरिकांच्या सुविधेसाठी मोठे व समतल फुटपाथ असावेत. याशिवाय पावसाळ्यात सिमेंट रस्त्यावर पाणी जमा राहू नये साठी पाण्याचा योग्य निचरा व्हावा, यासाठी आवश्यक ती व्यवस्था करणे व संबंधित अधिका-यांकडून कामाची वेळोवेळी पाहणी करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.