सुदैवाने जीवितहानी टळली।
रामटेक– रामटेक येथे रात्री नऊपासून सतत एक तास जोरदार वारा ,विजा आणि पाऊस झाल्यावर सकाळी साडेपाचला नगरपरिषदेमागील लोकांना काहीतरी जोरात पडल्याचा आणि स्पारकिंगचा आवाज जोरदार ऐकू आला. तसेच काही नागरिक बालोद्यानाजवळ आल्यावर त्यांना गुलमोहराचे झाड बुडापासून कोसळल्याचे दृश्य दिसून आले.झाड जवळून जाणाऱ्या तारांवर कोसळल्याने दोन पोल वाकली आणि तारही तुटली .
जागरूक नागरिकांनी ताबडतोब नगरपालिका व एमएसईबी प्रशासनाला फोन करून तात्काळ माहिती दिली.दररोज सकाळी पाच पासून अनेक नागरिक महिला मुले याच मार्गाने जातात आणि काही जण तर बगिच्यात येतात.पण लॉकडावूनच्या काळात नागरिकांचे या मार्गाने पहाटे फिरणे बंद झाले असून मोठी प्राणहानी टळली आहे.
विद्युत तारे तुटल्यामुळे बराच वेळ या भागातील विद्युत पुरवठा बंद होता . पालिका कर्मचाऱ्यांनी सकाळी ताबडतोड रस्त्यावर पडलेले झाड व त्याच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा केला व त्यानंतर एमएसइबीच्या कर्मचाऱ्यांचे लाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. विद्युत तारांच्या आजूबाजूला असलेल्या झाडाच्या फांद्या पूर्णपणे यावेळी तोडून टाकल्या जेणे करून भविष्यात कोणताही त्रास होऊ नये.सदर कोसळलेले गुलमोहराचे झाड आतून पोकळ होते आणि झाडांच्या मुळ्याची सोडलेल्या होत्या.
याच बगिच्यात अजून चारपाच जुनी झाडे असून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नये म्हणून नगरपालिका प्रशासनाने या घटनेची वेळीच दखल घेऊन बाकीची झाडे कापणे गरजेचे आहे.नाही तर बालोद्यानात फिरते वेळी एखाद्याच्या अंगावर झाड कोसळले तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.
