Published On : Mon, Jun 8th, 2020

प्रवाशांच्या ओझ्यावर कुलींच्या आयुष्याची गाडी

– पोट कसे भरणार? हाताला काम नाही
– प्रवासी आणि कुली दोघांनाही भीती

नागपूर: प्रवाशांच्या ओझ्यावरून (रुळावरून) कुलींच्या आयुष्याची गाडी चालते नव्हे धावते. मात्र प्रवासी रुळांची संख्याच कमी असेल तर कुलींच्या आयुष्याची गाडी चालणार तरी कशी, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पुढेही अशीच स्थिती राहिल्यास कुली ही संकल्पना टिकेल का, अशीही भीती व्यक्त केली जात असून तशी कुलींमध्ये चर्चा आहे.

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर भौतिक अंतर राखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर कुलींची संख्या नाममात्र म्हणजे दोन्ही पाळीत २० च्या जवळपास आहे. अशा स्थितीत प्रवाशांचे ओझे उचलून पोटाची भूक भागविणारा कुली संकटात आहे. हाताला कामच नसल्याने त्यांच्यासमोर भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुली आणि प्रवासी यांच्यात भीतीमुळे आणखी त्यात भर पडत असल्याचे बोलले जाते.

देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावर कुलींची संख्या जवळपास १४३ आहे. यापैकी बहुतेक कुली राजस्थान आणि बिहार राज्यातील आहेत. स्थानिक कुलींची संख्या केवळ ४५ ते ५० आहे. कोरोना विषाणू दाखल होताच परराज्यातील कुली स्वगृही निघाले. दरम्यान प्रवासी रेल्वे वाहतूकही दोन महिने बंद होती. या काळात कुलींचे प्रचंड हाल झाले. मानवता आणि सामाजिक भान जागृत ठेवून रेल्वे प्रशासनाकडून कुलींना दर १५ दिवसांनी धान्य किट वाटप करण्यात आली. शहरातील सामाजिक संघटनांनीही धान्य किट दिले. परंतु हे चालणार तरी किती दिवस?

प्रवासी गाडी सुरू होईल याकडे कुली आस लावून बसले होते. श्रमिक एक्स्प्रेस सुरू झाली परंतु कुलींच्या हाताला काम मिळाले नाही. १ जूनपासून देशभरात २०० प्रवासी गाड्या सुरू झाल्या. त्यातही नागपूरमार्गे ७ ते ८ गाड्या धावतात. तेव्हा मोजक्याच कुलींच्या हाताला काम मिळाले. सध्या रेल्वेस्थानकावर दोन पाळीत कुली काम करतात. सकाळी १० आणि रात्री १० असे २० कुली काम करीत आहेत. मात्र, पोटभर मिळत नसल्याने जगण्याचा आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. असे चालणार तरी किती दिवस? कुलींचे पोटच प्रवाशांच्या भरवशावर आहे. गर्दी टाळायची आहे.

भौतिक अंतर राखायचे आहे. स्पर्श तर दूरच हे सर्व नियम पाळायचे तर पोट कसे भरणार? सामान उचलण्यासाठी प्रवाशांजवळ जावेच लागेल. सामान उचलणे, बर्थवर ठेवणे, यासाठी जवळ तर जावेच लागेल. दुसरीकडे नियम तर पाळायचेच आहेत. या दोन्ही पेचात कुली आणि प्रवासी फसले आहेत. प्रवासी स्वत:ही सामान बर्थपर्यंत घेऊन जाऊ शकतात. परंतु कुलींचे काय? कधीपर्यंत राहील अशी स्थिती, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

सर्वांसाठी पॅकेज, कुलींसाठी काय?(पासपोर्ट राहुल नावाने)
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सरकारने सर्वांसाठीच पॅकेज दिले, मात्र कुलींसाठी काय? कुली रेल्वेचे महत्त्वपूर्ण अंग आहे. कुलींना पोटभर अन्न मिळावे यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी विनंती राहुल टेंभुर्णे यांनी केली. मिसाळ ले-आउट निवासी राहुल विवाहित असून त्याला मुलगी आणि आई आहे. तो किरायाच्या घरात राहतो. घर मालकाने किराया माफ केला. परंतु पोटाची खळगी कोण भरणार असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला आहे. मुलीचे शिक्षण, आईचे आरोग्य आणि पत्नीच्या अपेक्षा तर आहेत ना? कुली आहे म्हणून काय झालं, आमच्याही इच्छा आहेत, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला.

कुलींना मानधन जाहीर करावे (फोटो अब्दुल मजीद नावाने)
सध्या नागपूरमार्गे ७ ते ८ गाड्या धावत आहेत. प्रवाशांची संख्या सुद्धा कमी आहे. भौतिक अंतर राखायचे आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी मोजक्याच कुलींना प्रवेश देण्यात आला आहे. सध्या रेल्वेस्थानकावर दोन्ही पाळीत जास्तीत जास्त २० कुली आहेत. उपस्थित कुलींचे पोट भरेल एवढेही काम हाताला मिळत नाही. दिवसाला १५० ते २०० रुपये कसेतरी मिळतात, अशा स्थितीत कुलींनी कसे जगायचे, असा सवाल मध्य रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांनी उपस्थित केला. कुलींसाठी रेल्वे मंत्रालयाने मानधन जाहीर करावे अशी मागणी मजीद आणि जरीपटका निवासी सोनू गायकवाड यांनी केली.