मुंबई -महाराष्ट्राच्या राजकारणात आज इतिहास घडला. अनेक वर्षांच्या राजकीय वितुष्टानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडलेल्या विजयी मेळाव्यात दोन्ही बंधूंनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याची भूमिका घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या एकजुटीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलं आहे.
त्रिभाषा सूत्रावर निर्णायक विजय
मराठी जनतेच्या दबावामुळे राज्य सरकारला त्रिभाषा सूत्र मागे घ्यावं लागल्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सरकारवर हल्लाबोल केला. “मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखला होता, पण मराठी जनतेच्या आणि आमच्या एकतेच्या ताकदीने तो मोडीत काढला,” असं ते म्हणाले.
“आता आम्हीच फेकून देणार!”
उद्धव ठाकरे यांनी भाषणात स्पष्ट शब्दांत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. “सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी आम्हाला वापरलं गेलं, आणि वेळ येताच फेकून दिलं गेलं. पण आता आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोय, आता त्यांना आम्हीच बाजूला करू,” असं थेट आव्हान त्यांनी दिलं. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली आणि आपलं हिंदुत्व कधीच विसरले नसल्याचं स्पष्ट केलं.
ठाकरे-ठाकरे एकत्र; अनाजी पंतांचं सूत्र जुळलं
या ऐतिहासिक मंचावर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचं नातं खुलं स्वीकारलं. “आमच्यातला दुरावा आता संपला आहे. अनाजी पंतांनी तो अंतरपाट दूर केला. आता आम्ही फक्त एकत्र आलो नाही, तर एकत्र राहणार आहोत,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरे यांनीही मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक भाष्य करत “मुंबई आणि महाराष्ट्र आमचाच आहे,” असा ठाम पवित्रा घेतला.
राजकीय समीकरणं बदलणार?
या एकत्रिततेमुळे राज्यातील आगामी निवडणुकीचे सारे समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः शिवसेना आणि मनसेच्या समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून, मराठी मतांची एकजूट आता अधिक सशक्त होण्याची चिन्हं आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही युती महायुतीसाठी गंभीर आव्हान ठरू शकते.
मराठी जनतेला एकजुटीचं आवाहन
उद्धव ठाकरे यांनी सभेच्या शेवटी मराठी जनतेला आवाहन केलं की, आपण एकत्र राहिलो, तर कोणतीही शक्ती आपल्याला झुगारू शकत नाही.” त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत सांगितलं, “त्यांनी भोंदूपणाविरोधात संघर्ष केला आणि आम्ही तोच वसा पुढे चालवतोय.या ऐतिहासिक एकजुटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची नांदी झाली आहे. ‘मराठीपणा’ पुन्हा केंद्रस्थानी आणण्यासाठी ठाकरे बंधूंनी दिलेलं आव्हान राज्याच्या राजकारणाला कोणत्या दिशेने नेईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.