नागपूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. काँग्रेस, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी यावेळी भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. या सभेत आपल्या पक्षातील नेत्यांचे भाषणे ऐकण्यासाठी पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांतील लोकांचे जत्थे दर्शन कॉलनी मैदानात जमले. या सभेत उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील या नेत्यांनी सभेतील गर्दीचा आवर्जून उल्लेख केला.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे झेंडे लावून मैदान सजविण्यात आले होते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या झेंड्यांवर पक्षाचे चिन्ह होते. मात्र, शिवसेनेचा झेंडा फक्त भगवा होता. त्यावर कुठलेही चिन्ह नव्हते.
महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, माजी मंत्री आदित्य ठाकरे, अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, आ. नितीन देशमुख, आ. सुनील केदार आदी उपस्थित होते.
राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जनतेला अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहेत.
अवकाळी पावसाने पिके उध्वस्त होत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार सत्तेवर आले आहे, असा घणाघात करीत यांना सत्तेपासून खाली खेचण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही,असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वज्रमूठ’ सभेत म्हणाले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून शिंदे सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रात सुडाचे राजकारण सुरु आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या कामांना स्थगिती दिली. कोर्टात गेलो, कोर्टाने आदेश दिले तरी हे सरकार आजही कामांवरील स्थगिती उठविण्यास तयार नाही, असा घणाघात पाटील यांनी केला. उद्धव ठाकरे जे सोडून गेलेत त्या लोकांना गद्दार म्हणतात. त्यांना मी सांगू इच्छितो, कुछ तो मजबुरी रही होंगी, युही कोई बेवफा नही होता..
काहीतरी अडचण असेल, कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबुरी असेल समजून घ्या आता काय करणार, असेही जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभेत भाषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात कॉमेडी शो सुरु असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. संभाजीनगरमधील दोन गटांच्या वादात पोलिसांकडून मुद्दाम दुर्लक्ष झाल्याचा आरोप पटोले यांनी केला. नागपुरातील सभेच्या जागेचा वाद निर्माण करण्यात आला. भाजप का घाबरते? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. नागपूरकरांना लुटले जात आहे. पिण्याचे पाणी दिले जात नाही. नागपुरात भयावह परिस्थिती असल्याचे पटोले म्हणाले.पुलवामामध्ये सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील आरडीएक्स (RDX) हे नागपूरमधून गेले होते, असा खळबळजनक दावा पटोले यांनी केला. पुलवामा हल्ल्यासाठी 300 किलो आरडीएक्स वापरण्यात आले होते, असेही ते म्हणाले.
दरम्यान आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे भाषण झाले नाही.