Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jun 29th, 2020

  वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राला निधीची मागणी करणार – ऊर्जा मंत्री

  नागपूर: लॉकडाउनच्या काळात महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली.या काळातील वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत, वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करणार असून लवकरच याबाबतचे पत्र केंद्राला लिहिणार असल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

  मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे तो लवकरात लवकर दूर करण्याच्या दृष्टीकोनातून ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आज नागपुरातील उर्जा अतिथी गृह, बिजली नगर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

  घरगुती वीज ग्राहकांचे विद्युत शुल्क, वीज बिलाचे हफ्ते तथा कालावधी, एकरकमी विजेच्या बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना सवलत, वीज बिल हफ्त्यावरील व्याज तसेच इतर राज्याने केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून महावितरणने स्वयंपूर्ण प्रस्ताव दोन दिवसात सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले.

  लॉकडाउनमुळे ग्राहकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना अतिरिक्त भुर्दंड पडू नये तसेच त्यांना वीज बिल भरण्यासाठी जास्तीत जास्त सवलत कशा पद्धतीने देता येइल यादृष्टीने महावितरणने पाउले उचलावीत. सोबतच, बिलाबाबत ग्राहकांचे समाधान होण्यासाठी ग्राहकांशी प्रत्यक्ष अधिकाधिक संवाद वाढवावा, वीज बिल सोप्या भाषेत समजावून सांगावे , त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा प्रभावी वापर आणि जनमताच्या कौलाचा आदर देखील केला पाहिजे असेही ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

  मुंबई येथून प्रधान सचिव(उर्जा) दिनेश वाघमारे, संचालक(संचलन) दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, प्रभारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, कार्यकारी संचालक (देयक व महसूल) योगेश गडकरी तर नागपूर येथून हाय पॉवर कमिटीचे अनिल नगरारे, अनिल खापर्डे, महावितरण प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यवस्थापक वित्त व लेखा शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे प्रामुख्याने उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145