Published On : Mon, Dec 9th, 2019

दत्तोपंत ठेंगडीच्या सामाजिक आर्थिक विचारांच आर्थिक धोरणात समावेश व्हावा

– केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसेच केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच प्रतिपादन

नागपूर : कामगार नेते व श्रम सुधार प्रणेते स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी यांनी नैसर्गिक साधन संपत्तीचे दोहन न करता नीतिशास्त्र, पर्यावरण आणि परिसंस्था याचे संतुलन राखून आर्थिक विकासाचे जे प्रारूप दिले होते, त्या प्रारूपाचा अंगीकार आर्थिक धोरणात व्हावा.

ठेंगडी यांचे सामाजिक व आर्थिक विचार नवीन परिप्रेक्ष्यात समजून त्यांचा अवलंब करावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसेच केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत द्वारे स्व. दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्थानिक टिळक पत्रकार भवनात आयोजित ‘दत्तोपंथाचे अर्थशास्त्र’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे उपस्थित होते.

बांबू पासून लोणचे, फर्निचर, जैवइंधन निर्मिती होत असून बांबू आधारित अर्थव्यवस्थेमुळे चीन सारख्या देशात रोजगार क्षेत्रांमध्ये कायापालट झाला. आता अगरबत्ती उद्योगात आयात शुल्क कमी केल्यामुळे पूर्वोत्तर भारतात व इतर वनव्याप्त भागांमध्ये 25 लक्ष लोकांना रोजगार मिळाला असल्याच गडकरी यांनी सांगितले. स्वदेशीच्या व मानवी सहभागाच्या आधारावर जास्तीत जास्त उत्पादन आपण घेतले पाहिजे. व्यवस्थेतील आयात कमी करून निर्यात वाढ करण्याकरिता कृषी,ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे विशेष लक्ष देऊन आर्थिक प्रारूप मांडणे आवश्यक असल्याच त्यांनी सांगितले.


यावेळी स्वर्गीय बापू महाशब्दे यांच्या ‘पत्थर पायातील’ या पुस्तकाचे विमोचनही गडकरींच्या हस्ते करण्यात आले. या व्याख्यानाप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताचे प्रतिनिधी उपस्थित होते.