Published On : Tue, Mar 20th, 2018

सिंधी भाषेची सुरक्षा म्हणजे भारताची सुरक्षा : मोहन भागवत

Advertisement


नागपूर: प्राचीन, समृद्ध आणि श्रीमंत इतिहास असणाऱ्या देशांच्या पंक्तित यायचे असेल तर आपला इतिहास सिंध प्रांतापासून सुरु करावा लागतो. भारतीय संस्कृतीचा उगम सिंध प्रांतातून आहे. सिंधी भाषेची सुरक्षा म्हणजे भारताची सुरक्षा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

भारतीय सिंधू सभेतर्फे जरीपटका येथील दयानंद पार्क येथे आयोजित चेट्रीचंड महोत्सवात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर भारतीय सिंध सभेचे अध्यक्ष घनश्यामदास कुकरेजा, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सतीश आनंदानी, राजेश बरवानी, सुनील वासवानी, दीपक बीखानी, अनिल भारद्वाज उपस्थित होते.

सरसंघचालक मोहन भागवत पुढे बोलताना म्हणाले, भारत देशात निरनिराळ्या भाषा, वेश, प्रांत आहेत. प्रत्येक प्रांताचे भोजन वेगवेगळे आहे. परंतु या साऱ्या बाबी आम्हाला एका देशाशी जोडतात. भाषा, प्रांत, सभ्यता हे या भारत देशाचे अलंकार आहेत. साजसज्जा आहे. प्रत्येक उत्सवाची विविधता आहे. मात्र या साऱ्यामागची भावना एक आहे. विविधतेला, एकतेच्या भावनेला सोबत घेऊन चालणे ही आमची संस्कृती आहे. या प्रकारचा अनुभव देण्यासाठी आणि घेण्यासाठी मी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. भाषा, वेशभूषा, भवन, भजन, भ्रमण यांची सुरक्षा करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो. १४ ऑगस्ट है दिवस सिंधी समाज काळा दिवस म्हणून पाळत असले तरी भविष्यात सिंधच्या भूमीवर उभे राहून त्याच दिवशी संत कंवरराम यांची भजन सिंधी बांधव गातील तो दिवस शुभ दिवस असेल, असे ते म्हणाले.


प्रास्ताविकातून श्री. घनश्यामदास कुकरेजा यांनी सिंध संस्कृतीचे विवेचन केले. सिंध प्रांतातून आलेला हा समाज आता भारतालाच सिंध प्रांत मानतो. आपल्या कृतीतून या समाजाने आपण शरणार्थी नाही तर पुरुषार्थी असल्याचे सिद्ध केले. या पुरुषार्थातूनच या समाजाने परमार्थ साधला. आता सिंध भाषेला जिवंत ठेवण्याचे प्रयत्न हा समाज करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ततपूर्वी श्री. घनश्यामदास कुकरेजा यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा पारंपरिक पगड़ी घालून, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. संचालन श्रीमती सचदेव यांनी केले. यावेळी डॉ. विंकी रुग्वानी, नगरसेविका प्रमिला मंथरानी, प्रीतम मंथरानी, डॉ. मेघराज रुग्वानी, डॉ. अभिमन्यु कुकरेजा महेश साधवानी, रूपचंद रामचंदानी, किसन आसुदानी उपस्थित होते.