महापौरांचे निर्देश : करावरील व्याज कमी करण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना
नागपूर: नागपूर महानगरपालिकेची सुरक्षा मे. किशोर एजन्सी आणि मे. सुपर सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्याकडील अनुज्ञप्तीची मुदत संपल्यानंतरही त्यांचे कंत्राट कसे काय सुरू होते, या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी आणि आयुक्तांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून सदस्यांना लेखी उत्तर द्यावे, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी महासभेत दिले.
यासंदर्भात नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिलेल्या नोटीसवर चर्चा झाल्यानंतर महापौरांनी सदर निर्देश दिले. मे. किशोर एजंसी व मे. सुपर सिक्युरिटी सर्व्हिसेस यांनी मनपात सुरक्षा रक्षक पुरविण्याकामी घेतलेल्या कंत्राटाची पोलिस अनुज्ञप्तीची मुदत २८ जुलै २०२० रोजी संपलेली असताना देखिल सामान्य प्रशासन विभागातर्फे एजंसीवर कारवाई करण्यात आली नाही, असा मुद्दा श्री. मेश्राम यांनी उपस्थित केला. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने यासंदर्भात महापौरांनी स्वत: निर्णय घेण्याची विनंती. ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली. यावर महापौरांनी याबाबत स्वत: आयुक्तांनी लक्ष घालून चौकशी करावी व संबंधित नगरसेवकांना उत्तर देण्याचे निर्देश दिले.
कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व आर्थिक स्थितीमुळे मागील आर्थिक वर्षातील मालमत्ता कर, पाणी कर व मनपाचे विविध देयके भरण्यास नागरिकांना विलंब होत असल्यामुळे त्यावर आकारण्यात येणाऱ्या वार्षिक २४ टक्के व्याजाची रक्कम माफ करण्यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी दिलेल्या नोटीसवर निर्देश देताना महापौर दयाशंकर तिवारी यांनी म्हटले की, नागरिकांना दोन महिन्यांची मुदत देऊन त्यांनी एकरकमी संपूर्ण कर भरल्यास त्यांना व्याज माफ करण्यात येईल. यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले.
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकही बंद होते. रेल्वे रुळावर असलेल्या घुशी आणि उंदराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वसाहतीत झाला. यामुळे नागरिक त्रस्त आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील उंदीर व घुशीवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक किशोर जिचकार यांनी चर्चा करण्यासंदर्भात नोटीस दिली होती. महानगरपालिकेने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून यावर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
नद्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी बैठक
नागपूर शहरातील विविध नद्यांच्या परिसरात अतिक्रमण आहे. चारचाकी विक्री करणाऱ्यांची संख्या यात मोठी आहे. व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या जागेत केलेल्या अतिक्रमणावर काय कारवाई केली यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी दिलेल्या नोटीसीला उत्तर देताना, ती नासुप्रची जागा असल्याने त्यांच्याकडून कारवाई अपेक्षित असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, हा विषय गंभीर असून नासुप्रतर्फे जर कारवाई होत नसेल तर मनपाने पुढाकार घेऊन येत्या शुक्रवारी मनपा अधिकारी, पोलिस वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी. आपण स्वत: आणि आयुक्त त्यात उपस्थित राहणार. या बैठकीत त्यावर निर्णय घेऊन सुमारे २० ते ३० दिवस असे अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम उघडावी, अशी सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली.
