Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 20th, 2020

  चित्रपटातील पुरस्कारांपेक्षा शेतकऱ्यांसाठी काम केल्याचे समाधान मोठे : नाना पाटेकर

  महिला उद्योजिका मेळाव्याचे शानदार उद्‌घाटन : मनपाच्या महिला व बालविकास समितीचे आयोजन

  नागपूर : मॉलमध्ये गेल्यावर तेथे दुकानदारांनी ठरविलेल्या किंमतीच्या महागड्या वस्तू आपण घेतो. मात्र, शेतकऱ्यांनी पिकविलेल्या वस्तू घेताना भाव करतो. या देशात सर्व वस्तूंचे भाव ठरलेले आहे. फक्त शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, अशी खंत व्यक्त करीत चित्रपट अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी आपण शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचे समाधान आहे आणि हे समाधान चित्रपटासाठी मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा कितीतरी पटीने मोठे असल्याचे प्रतिपादन केले.

  नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने रेशीमबाग मैदानावर १९ ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे शानदार उद्‌घाटन रविवारी (ता. १९) झाले. याप्रसंगी उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. मंचावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या दिव्या धुरडे, मनीषा अतकरे, विरंका भिवगडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, मनपातील शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, माजी महापौर नंदा जिचकार, , नगरसेवक हरिश दिकोंडवार, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, मनीषा लांबट यांची उपस्थिती होती.

  उद्‌घाटक नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या व्हिजनचे आणि कार्याचे कौतुक केले. ना. नितीन गडकरी यांचा जिथे हात लागतो, ती गोष्ट यशस्वी होतेच. राजकारणातील ती एकमेव अजातशत्रू असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी केला. कुठलाही प्रयोग यशस्वी होणार की नाही याची तमा न बाळगता ते करतात. त्यांनी सभोवताल विश्वासू माणसे जमविली. हेच त्यांच्या यशस्वी आणि व्हिजनरी कारकिर्दीचे गमक असल्याचे ते म्हणाले. नाम फाऊंडेशनचे कार्य हे मनाला समाधान देणारे आहे. शेतकऱ्यांसाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून चार महिन्यात ६० कोटी लोकांनी दिले. कोण किती पैसे देतो, हे महत्त्वाचे नाही. त्यामागील त्याची भावना महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले, उद्यमशीलतेला वाव देण्यासाठी आणि बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी महिला उद्योजिका मेळाव्याची संकल्पना मांडण्यात आली. मागील दहा वर्षात या मेळाव्याने अनेक महिला उद्योजकांना बाजारपेठ मिळवून दिली. यापूर्वीच्या महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून आता बचत गटांच्या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. यापुढे महिला व बालकल्याण समितीने महिला बचत गटांचं मोठ संमेलन घ्यावे. त्यांना उद्योगासाठी कर्ज मिळवून देऊ. प्रामाणिकपणे काम करून या महिलांना आर्थिक विकास साधावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. कुठलही वस्तू टाकाऊ नाही. त्यातून काहीतरी निर्माण करता येते.

  त्याला उद्योगाच्या दृष्टीने बघितले तर अनेक उद्योग टाकाऊ वस्तूपासून निर्माण होऊ शकतात. महात्मा गांधीजींच्या विचारांचा दाखला देत ते म्हणाले, जास्तीत जास्त उत्पादन जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून घेतले पाहिजे. यातूनच उद्यमशीलता वाढते असे सांगत देशात सुरू असलेल्या विविध नव्या प्रयोगांचा संदर्भ त्यांनी यावेळी दिला. नागपुरात आजही सुमारे अडीच हजार सायकल रिक्षा असतील. माणसाला माणूस यापुढे ओढणार नाही, हे लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेने एक योजना तयार करावी आणि सर्व सायकलरिक्षा चालकांना ई-रिक्षा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

  प्रास्ताविकातून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे यांनी महिला उद्योजिका मेळाव्यामागील भूमिका विषद केली. नागपूर व विदर्भातील बचत गटांचे सुमारे ४०० स्टॉल्स मेळाव्यात असून पुढील सात दिवसांत संपूर्ण नागपूरकरांनी मेळाव्याला भेट द्यावी. महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.

  तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर संदीप जोशी आणि नाना पाटेकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते महिला सबलीकरणाची मशाल प्रज्वलित करून महिला उद्योजिका मेळाव्याचे शानदार उद्‌घाटन करण्यात आले. ‘कृषिसंस्कृती आपली शान, शेतकरी बांधवांचा राखू मान’ असा संदेश फलक असलेला बलून यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोडण्यात आला. उद्‌घाटन कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांसाठी प्रफुल्ल माटेगांवकर यांचा ‘सह्याद्रीची सात रत्ने’ आणि रश्मी शर्मा यांचे नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आसावरी देशपांडे यांनी केले. आभार उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला बचत गटांच्या महिलांसह नागपूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
  महिला उद्योजिका मेळाव्यादरम्यान दररोज पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. उद्‌घाटन सोहळ्यादरम्यान चित्रकार प्रा. ज्योती हेजीब, बाल नेत्र विशेषज्ञ डॉ. सुवर्णा बालंखे, आकार इंटेरियरच्या सुनीता गांधी, गोल्डन लिव्हज्‌ बॅक्वेटच्या ममता जयस्वाल आणि मतिमंदाच्या ॲथेलेटिक्समध्ये भारताला अनेक पदके मिळवून देणारी अश्विनी अटाळकर यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नाना पाटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  उद्योगांसाठी दिव्यांग बचत गटांना अर्थसहाय्य
  नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांगांना व्यवसायाकरिता अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग पुरुष बचत गट आणि वैयक्तिक अर्थसहाय्य म्हणून ४० लाख सहा हजार ५७१ रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. दिव्यांग विकास पुरुष बचत गट, दिव्यांग स्वाभिमान पुरुष बचत गट, भवानी स्वयंसहायता दिव्यांग महिला बचत गट, पाऊल पुरुष अपंग बचत गट यांना तसेच १२ जणांना वैयक्तिक अर्थसहाय्याचे धनादेश देण्यात आले. २६ जणांना मोटोराईज्ड ट्रायसिकल देण्यात आल्या. तर सहा दिव्यांगांना ट्रायसिकल देण्यात आल्या.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145