Published On : Mon, Jan 20th, 2020

पोलिओ डोजपासून कुणीही वंचित राहू नये : महापौर संदीप जोशी

Advertisement

राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान : १,९५,४५० बालकांना पाजला पोलिओ डोज

नागपूर : देश पोलिओमुक्त झाला आहे. मात्र, भविष्यात एकही पोलिओचा रुग्ण आढळू नये यासाठी दरवर्षी पल्स पोलिओ अभियान राबविण्यात येते. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना जवळच्या केंद्रात जाऊन पोलिओ डोज पाजावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

नागपूर शहरात नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओ अभियान राबविण्यात आले. अभियानाचा शुभारंभ महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्रात प्राही प्रवीण दटके हिला महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते पोलिओ डोज पाजून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी नागपूर मंडळ आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल, आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद खान, महाल रोगनिदान केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, गांधीबाग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन यांची उपस्थिती होती.

नागपूर शहरात मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अपर आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबविण्यात आला. नागपूर शहरातील सर्व मनपा दवाखाने, स्वयंसेवी संस्थांचे दवाखाने, नर्सिंग स्कूलच्या प्रशिक्षणार्थी, शासकीय दवाखाने, रेल्वे दवाखाने यांचा मोहिमेत सहभाग होता. रेल्वे स्टेशन, गणेश टेकडी, स्वामी नगरायण मंदिर आणि बस स्थानके, वीटभट्ट्या, चुंगी नाके येथे ट्रांझीट बुथ व बांधकाम, विमानतळ, मंगल कार्यालये, रस्त्यावील बालकांना मोबाईल टीमद्वारे डोज पाजण्यात आले. बालरोग तज्ज्ञांकडे लस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

नागपूर शहरात आजच्या अभियानादरम्यान १,९५,४५० बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आला. ही टक्केवारी ७०.६९ इतकी आहे. २१ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान शहरातील घरोघरी स्वयंसेवक व कर्मचारी भेट देणार असून उर्वरीत बालकांना पोलिओची लस पाजणार आहेत. या मोहिमेला १०० टक्के सहकार्य करण्याचे आवाहन पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.