Published On : Mon, Jan 20th, 2020

तंत्रज्ञानाच्या साह्याने आयात कमी होणे गरजेचे : नितीन गडकरी

-व्हीएनआयटीचा हीरक महोत्सव
-विश्वेश्वरैया यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
-फुटबॉल मैदानाचे उद्घाटन

नागपूर: देशात विविध प्रकारचे तंत्रज्ञान दररोज विकसित होत आहे. कच्चा मालही पुरेशा प्रमाणात आहे. असे असतानाही पेट्रोल, डिझेल,कोळसा, पेपर आपल्याला मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. तंत्रज्ञानाच्या साह्याने आता आयात कमी झाली पाहिजे, असे मत केंद्रीय सडक परिवहन, राजमार्ग व सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

व्हीएनआयटीच्या हिरक महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी व्हीएनआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्राम जामदार, डॉ. प्रमोद पडोळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विश्वेश्वरैया यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच फुटबॉल मैदान आणि चंद्रमा स्टुडंट प्लाझाचे उद्घाटन गडकरींच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले- व्हीएनआयटी आणि एलआयटी या संस्थांमधून शिकून गेलेले विद्यार्थी देशात अनेक ठिकाणी मोठ्या पदांवर आहेत किवा मोठे उद्योगपती झाले आहे. संस्थेच्या विकासाच्या प्रकल्पांसाठी या उद्योगपतींचे योगदान मिळवणे ही आनंदाची बाब आहे. अशीच मदत मिळवून हे प्रकल्प पूर्ण करावेत. याशिवाय निधीची आवश्यकता पडली तर शासनाची मदत आपण मिळवून देऊ, असे ते म्हणाले.

सकारात्मकतेने कामे केल्यास ती यशस्वी होतात. गेल्या 5 वर्षात मी 17 लाख कोटींची कामे देशात केली. यंदाही 5 लाख कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे वर्षभरात होतील. देशात आज 50 लाख कोटी रुपयांच्या इंधन व विविध वस्तूंची आयात करावी लागते. ही आयात बंद होऊन निर्यात वाढविली पाहिजे. निर्यातवाढीसाठी प्रोत्साहन मिळावे अशी शासकीय नीती तयार करण्याची गरज आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्हा जैविक इंधनावर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही गडकरी म्हणाले.

डॉ. विश्राम जामदार
एखाद्या संस्थेच्या आणि मनुष्याच्या जीवनात 60 वर्षे ही महत्त्वाची असतात. आता सिंहावलोकन करण्याची वेळ आली असल्याचे सांगताना व्हीएनआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्राम जामदार म्हणाले- 2002 मध्ये व्हीआरसीईचे व्हीएनआयटी झाले. या 18 वर्षाच्या प्रवासात संस्थेत बरेच बदल झाले. संस्थेची प्रगती झाली.

उद्योग 40 ही संकल्पना आता आली आहे. या संकल्पनेतून संस्था आणि उद्योग संबंध अधिक प्रगल्भ होणार आहेत. तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या सर्व प्रयोगशाळा या संस्थेत उभारल्या गेल्या आहेत. 10 हजार विद्यार्थ्यांना तंत्रप्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. यावेळी संस्थेत राबविण्यात येणार्‍या विविध प्रक़ल्पांसाठी निधी संस्थेच्या प्राचार्य, प्राध्यापक, शास्त्रज्ञांनी उभारला असून त्या सर्व चमूंचा गडकरींच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात 1985, 84, 83, 1992 अशा विविध वर्षाच्या चमूंचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एम. पडोळे यांनी केले. या कार्यक्रमाला विश्वेश्वरैया यांचे नातू सतीश मोक्षगुंडम हेही आवर्जून उपस्थित होते. त्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन ना. गडकरी यांनी गौरव केला.