Published On : Sat, Jun 23rd, 2018

रेल्वेने भंगारातून कमाविले तब्बल २७ लाखांचे उत्पन्न

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेतून ई-ऑक्शन हा उपक्रम हाती घेतला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ई-ऑक्शनच्या माध्यमातून भंगार विक्री सुरु केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात या भंगार विक्रीतून नागपूर मंडळाला २७ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून २५ कोटी उत्पन्नाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून केवळ १५ दिवसात २७ लाखांचे महसूल जमा झाले आहे. पूर्वी भंगार विक्रीचे अधिकार रायपूरच्या मुख्य सामग्री व्यवस्थापक कार्यालयाला होते. मात्र, आता हे ऑक्शन विभाग स्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

४ जून रोजी मंडळ व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या हस्ते या प्रणालीचा शुभारंभ झाला. ऑक्शन पद्धतीने भंगार विक्री करण्याची दपूमरेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला असून विक्री प्रक्रिये मध्ये पारदर्शकता ठेवणे सोयीचे राहणार आहे.