Published On : Wed, Jul 22nd, 2020

महापौर चषक ‘कुटुंब रंगलंय गाण्यात’ स्पर्धेचे निकाल जाहीर

अद्वैत कडवे, सुनील आगरकर, रेवती नाई विविध गटांतील विजेते

नागपूर, ता. २१ : लॉकडाऊनचा वेळ सत्कारणी लागावा, लोकांना मनोरंजनाचे साधन मिळावे या हेतूने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून ‘कुटुंब रंगलंय गाण्यात’ या उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिका आणि संस्कार भारतीच्या संयुक्त विद्यमाने ‘महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये विविध गटांतून अद्वैत कडवे, सुनील आगरकर, रेवती नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

सदर स्पर्धेमध्ये भक्तीगीत, सिनेगीत आणि देशभक्ती गीत असे तीन प्रकार ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुटुंबातील कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त आठ व्यक्तींची अट होती. या स्पर्धेला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोनशेपेक्षा अधिक प्रवेशिका स्पर्धेसाठी प्राप्त झाल्यात. नियम आणि अटींचे पालन करीत एकापेक्षा एक सरस गाण्यांचे व्हिडिओ स्पर्धकांनी अपलोड केले. प्रत्येक गटासाठी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली होती. प्रत्येक गटातून प्रथम येणाऱ्या स्पर्धकांना महापौर चषक आणि २१ हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ११ हजार रुपये आणि एक हजार रुपयांचे पाच प्रोत्साहन पुरस्कार आणि प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले होते. लॉकडाऊनमधील या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे परिक्षण डॉ. दत्ता हरकरे, श्रीमती स्मिता जोशी यांनी केले. महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी (ता. २१) बक्षिसांची घोषणा केली. सर्व विजेत्या स्पर्धकांचे महापौर संदीप जोशी, संस्कार भारतीच्या महानगर अध्यक्षा कांचनताई गडकरी आणि संस्कार भारतीचे महामंत्री मनोज श्रोती यांनी अभिनंदन केले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासंदर्भात लवकरच स्पर्धकांना कळविण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.

गटनिहाय विजेते :

भक्तिगीत स्पर्धा : प्रथम – अद्वैत कडवे, द्वितीय – गार्गी राजहंस, तृतीय – श्वेता सायंकर, प्रोत्साहन – अशोक पत्की, पूजा मिलमिले, अमोल भोपळे, शैलेश जैन, सुप्रिया कुथे.

देशभक्ती गीत स्पर्धा : प्रथम – सुनील आगरकर, द्वितीय – चेतन एलकुंचवार, तृतीय – क्षितीज देशमुख, प्रोत्साहन – श्रुती पांडवकर, शुभांगी मानकर, अंश गजभिये, जयश्री रहाटे, परिमल जोशी.

सिनेगीत स्पर्धा : प्रथम – रेवती नाईक, द्वितीय – मयूर खैरकर, तृतीय – भाग्यश्री टिकले, प्रोत्साहन – मानसी देशपांडे, पुष्कर डोंगरे, प्राची खडक्कार, धनंजय भिसेकर, सुचित राजहंस.