Published On : Wed, Jul 22nd, 2020

नियमांच्या बाबतीत मनपा आयुक्त आक्रमक

Advertisement

सदर, इंदोरा, जरीपटका, गांधीबाग भागात दौरा : अनेक दुकानांवर दंड

नागपूर : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतीदरम्यान लॉकडाऊनचे नियम पाळा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा, असे आवाहन वारंवार करण्यात आल्यानंतरही अनेक ठिकाणी नियमांना पायदळी तुडविले जात आहे, हे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या लक्षात येताच ते आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सदर, इंदोरा, जरीपटका भागातील बाजारांचा दौरा करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या अनेक दुकानदारांवर दंड ठोठावला.

विशेष म्हणजे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे हे दौरे आकस्मिक आहेत. सायंकाळपर्यंत ते कुठे जातील, याची माहिती अधिकाऱ्यांनाही नव्हती. आज (ता. २१) सायंकाळी ५ वाजता ते मनपा मुख्यालयातून निघाले आणि थेट सदर बाजार परिसरात पोहोचले. तेथे कराची गलीमध्ये अतिक्रमण करून दुकान थाटणाऱ्या एका व्यक्तीवर १० हजारांचा दंड ठोठावला. सदर बाजार परिसरात स्वत: फिरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलेच दरडावले. यानंतर मंगळवारी कॉम्प्लेक्स समोर फुटपाथवर वाहने लावलेली त्यांना आढळली. या सर्व वाहनांधारकांवर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले. तेथेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला.

यानंतर लगेच त्यांनी इंदोरा, जरीपटका, नारा रोड या भागात पाहणी केली. तेथेही त्यांना नियमांचे उल्लंघन होत असताना आढळले. या भागातीलही अनेक दुकानदारांवर १० हजारांचा दंड ठोठावला.

त्यानंतर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांधीबाग परिसरात आपला ताफा वळविला. तेथे गल्ल्यागल्ल्यांमध्ये फिरून रात्री ७ नंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. यानंतर सेंट्रल एव्हेन्यूवर असलेल्या ऑटोमोबाईल्स दुकानदारांनी फुटपाथवरच आपली दुकानदारी थाटल्याचे त्यांना दिसले. त्या संपूर्ण रांगेतील दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यानंतर त्यांनी आपला दौरा कस्तुरचंद पार्कमार्गे सेंट्रल एव्हेन्यूकडे वळविला. कस्तुरचंद पार्कसमोरील दोन मोठ्या शो रूमवर रात्री ७.३० वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवले म्हणून दंडात्मक कारवाई केली.

अनेक वाहनचालकांवर कारवाई
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज आपल्या दौऱ्यात कस्तुरचंद पार्क आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर स्वत: उभे राहून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. विना हेल्मेट आणि डबल सीट फिरणाऱ्या वाहनचालकांना श्री. मुंढे यांनी स्वत: अडवून समज दिली. नियम मोडणाऱ्या अशा प्रत्येक वाहनचालकांवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली.
नियम सर्वांसाठी सारखेच !

वाहनांची तपासणी करताना दुचाकीवर डबलसीट जाणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अडविले. तिने ओळखपत्र दाखवित आपण शासकीय सेवेत असल्याचे सांगितले. ते ओळखपत्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: ठेवून घेतले. ‘नियम सर्वांसाठी सारखेच’ असे म्हणत उद्या मनपा कार्यालयात येऊन ओळखपत्र घेऊन जा, असे सांगितले.