Published On : Thu, Jul 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

शाळा सुटली म्हणजे विद्यार्थांच्या सुरक्षेची जबाबदारी संपत नाही; हायकोर्टाचे स्पष्ट मत

Advertisement

नागपूर -विद्यार्थी शाळेच्या गेटबाहेर पडला किंवा स्कूल बसमध्ये बसला म्हणून शाळेची जबाबदारी संपत नाही. विद्यार्थी सुरक्षितपणे पालकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेचीच असते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, स्कूल बस ही शाळेचाच अविभाज्य भाग आहे.

हे निरीक्षण कर्नाटकातील मांड्या येथील दिव्यज्योती स्कूलविरोधातील प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नोंदवण्यात आले. १ ऑगस्ट २०२५ रोजी शाळेची बस घरी जात असताना काही विद्यार्थ्यांनी स्पार्कलर पेटवले. त्यातील ठिणग्या एका विद्यार्थ्याच्या डोळ्यात गेल्याने त्याची एका डोळ्याची दृष्टी कायमची गेली. या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्याला ४० टक्के कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचेही प्रमाणित करण्यात आले.

या घटनेनंतर पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार दाखल केली. बसमध्ये अटेंडंट नव्हता, सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख ठेवण्यात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला.

या एफआयआरविरोधात शाळा व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेत कारवाई रद्द करण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही कायदेशीर आणि बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement

न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांनी आपल्या आदेशात नमूद केले की, बसमध्ये अटेंडंट होता की नाही, सीसीटीव्ही कार्यरत होता का, विद्यार्थ्यांकडे धोकादायक वस्तू कशा पोहोचल्या आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कृतीमुळे घटना घडली असली, तरी शाळेचा निष्काळजीपणा असेल तर व्यवस्थापन जबाबदारी टाळू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रथमदर्शनी हे प्रकरण भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 125(अ) अंतर्गत निष्काळजीपणामुळे मानवी जीवन धोक्यात आणल्याच्या स्वरूपाचे असल्याचे नमूद करत न्यायालयाने शाळेची याचिका फेटाळली आणि पोलिस तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.