Published On : Mon, Oct 23rd, 2017

अक्षरदुर्वात देशाच्या संस्कृती आणि परंपरेचा अभ्यास : ऊर्जामंत्री बावनकुळे


नागपूर: श्रीमती वृंदा पाठक यांच्या अक्षरदुर्वा या पुस्तकातून देशाच्या संस्कृती आणि परंपरेचा अभ्यास केला असून परिवार या शब्दाची व्याख्या वृंदाताईंनी अत्यंत समर्पक शब्दात केली आहे. प्रचंड ताकद देणारे हे पुस्तक असून त्यातील कथा आणि कवितांचे लेखन मन ओतून केले असल्याचा प्रत्यय या पुस्तकातून होतो, असे विचार ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

लक्ष्मीनगरात रविवारी सायंकाळी अक्षरदुर्वा या पुस्तकाचे प्रकाशन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमासाठी लेखिका वृंदा पाठक, सौ. ज्योती बावनकुळे, पुण्याचे उल्हास लाटकर, तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव आणि न्यूज इंडिया या वाहिनीचे मनीष अवस्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

ऊर्जामंत्री पुढे म्हणाले- आताच्या पिढीला आणि या पुढील पिढीलाही चांगले संस्कार आणि मार्गदर्शन या पुस्तकातून होणार आहे. परिवार एकसंध कसा राखावा यासाठी या पुस्तकाचे योगदान मोठे आहे. वृंदाताईंनी आपला परिवार प्रचंड ताकदीने, सुसंस्कारित, सुशिक्षित आणि एकसंध ठेवला. एकप्रकारची ऊर्जा देणारे विचार या पुस्तकात असल्याचेही ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.

वृंदा पाठक यांच्या चिंतन आणि मननातून या पुस्तकाची निर्मिती झाली असल्याचे सांगताना गजानन निमदेव म्हणाले- वृंदाताईंच्या स्वभाव व गुणांचे प्रतिबिंब या पुस्तकातून पाहायला मिळते.

चोकारीबध्द जीवन जगण्यापेक्षा आपल्यातील कलागुणांना वाव देत जीवन जगावे. संसाराच्या जबाबदार्‍या पार पाडीत असताना स्वत:साठी जगण्याचा प्रयत्न केल्याचे वृंदाताई पाठक म्हणाल्या. तसेच स्वांतसुखाय साहित्य इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून आपण केल्याचेही त्या म्हणाल्या.

न्यूज इंडियाचे मनीष अवस्थी यांनीही ÷अत्यंत खुमासदारपणे आपले विचार व्यक्त केले. पुस्तकाचे प्रकाशक उल्हास लाटकर यांनी प्रास्ताविक केले. 43 कविता आणि 22 ललितपर कथांचा समावेश या पुस्तकात आहे. संतसाहित्य वाचनाचा अनुभव या पुस्तकातून होतो. पाठक कुटुंबाचे कौटुंबिक बंध किती मजबूत आहेत, हेही या पुस्तकाने वाचकांना दाखवले आहे.

कार्यक्रमाचे संचालन वृंदाताईचे मोठे चिरंजीव श्रीपाद पाठक यांनी केले. आभार विश्वास पाठक यांनी मानले. संजीवनी पाठक यांनी पसायदान सादर केले. याप्रसंगी वर्षा प्रतापे, सीमा जोशी अन्य मित्र चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.