Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Nov 15th, 2020

  तीन झोनमधील ६० मालमत्तांची विक्री प्रक्रिया सुरू

  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश : मालमत्ता कर भरा, कारवाई टाळा

  नागपूर: वर्षानुवर्षांपासून थकीत स्थावर किंवा जंगम मालमत्तांचा कर न भरणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेतर्फे कडक कारवाई सुरू झालेली आहे. थकीत मालमत्ता कर संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गांभीर्याने दखल घेत मालमत्ता जप्ती व विक्रीचे आदेश जारी केले आहेत. मनपा आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी कार्यवाही करीत मनपाच्या लक्ष्मीनगर, गांधीबाग व मंगळवारी या तीन झोनमधील एकूण ६० मालमत्ता जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या सर्व मालमत्तांची लिलाव प्रक्रियेअंतर्गत विक्री करण्यात येणार आहे, याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली असून लक्ष्मीनगर झोनमधील एका मालमत्तेची विक्री सुद्धा करण्यात आली आहे.

  वर्षानुवर्षांपासून मालमत्ता कर न भरणारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २७, गांधीबाग झोन अंतर्गत १० आणि मंगळवारी झोन अंतर्गत २३ मालमत्ता आढळून आल्या. या सर्व मालमत्ता जप्त करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम १२८ व कराधान नियम ४२, कराधान नियम ४५ व ४७ च्या कार्यवाही अंतर्गत लिलाव प्रक्रिया राबवून विक्री करून थकीत रक्कम वसूल करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

  त्यानुसार लक्ष्मीनगर झोन अंतर्गत श्रीमती वृंदा दाडू यांनी घर क्रमांक ३८८०/३६ वार्ड क्रमांक ७५ चा मालमत्ता कर मागील २७ वर्षापासून न भरला नाही. संबंधित मालमत्ताधारकाकडून मनपाला ६२४०० रुपये कर वसूल करणे अपेक्षित होते. त्याकरिता महाराष्ट्र मनपा अधिनियमानुसार मालमत्तेची विक्री करण्यात आली. यामध्ये महत्तम बोलीधारक श्री.अजय कुशवाह यांना सदर मालमत्ता ५७ लक्ष रूपयांमध्ये विक्री करण्यात आली. गुरूवारी (१२ नोव्हेंबर) मालमत्तेची पंजीबद्ध विक्री परीपूर्ण प्रमाणपत्राद्वारे खरेदीदार श्री. अजय कुशवाह यांना हस्तांतरीत करण्यात आली आहे.

  मनपाच्या मालमत्ता कर संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ६ नोव्हेंबर रोजी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांची विशेष बैठक घेतली. बैठकीत सर्व सहायक आयुक्तांना मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट नेमून देण्यात आले. सर्व झोनकडून मालमत्ता कर संदर्भात दैनंदिन मालमत्ता कर वसूलीबाबत अहवाल मागवून ते उद्दिष्ठानुसार होत आहे अथवा नाही याची आयुक्तांद्वारे शहानिशा करण्यात येत आहे.

  मालमत्ता कर संदर्भात मनपाद्वारे कठोर पावित्रा घेण्यात आला असून थकीत मालमत्ता कर धारकांनी विहित कालावधीमध्ये मनपाच्या संबंधित झोन कार्यालयात मालमत्ता कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145