Published On : Sun, Nov 15th, 2020

प्लाज्मा दान करा : राम जोशी प्लाज्मामुळे कोरोना रुग्णांना लाभ

Advertisement

नागपूर : प्लाज्मा देणे ही रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. कोरोनामधून मुक्त झालेल्यांनी दान केलेला प्लाज्मा अत्यवस्थ वा गंभीर कोरोना रुग्णांना दिल्या जातो. कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाज्मा दान करावे, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी केले आहे.

श्री. राम जोशी कधी कोरोना बाधित नाही झाले. कोरोनाच्या काळातही ते दररोज डयूटीवर होते आणि त्यांच्यावर कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती. यादरम्यान त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूचा प्रतिकार करणारी प्रतिजैविके (ॲन्टिबॉडीज)तयार झाली. रक्तातील प्लाज्मा वेगळे करुन अन्य गंभीर कोविड रुग्णाला दिल्यास कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मदत करतात. त्यामुळे त्यांनी लाईफ लाईन ब्लड बँक, नीति गौरव कॉम्प्लेक्स, रामदासपेठ मध्ये जाऊन प्लाज्मा दान केला आहे. कोविडमधून बरे झालेल्या प्रत्येकाने प्लाज्मा दान करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.

प्लाज्मा बँक मध्ये ॲन्टिबॉडीज तयार झाल्यानंतर प्लाज्मा दान करता येते. लाइफ लाइन ब्लड बँक चे प्रमुख डॉ. रवि वरभे यांनी अगोदर त्यांची आर.बी.डी. टेस्ट केली नंतर त्यांचा प्लाज्मा घेतला. यावेळी डॉ. रवि वरभे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर उपस्थित होते.

प्लाज्मा दान करणे हे सध्याच्या परिस्थितीत खूप महत्वाचे व आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनामधून मुक्त झालेल्यांनी प्लाज्मा अवश्य करावे. प्लाज्मा दिल्यामुळे गंभीर आजार असलेल्यांचा जीव वाचविण्यात आपला हातभार ठरु शकतो. प्लाज्मा देणे ही रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. रक्तदानानंतर रक्ताचे शुद्धीकरण होवून प्लाज्मा वेगळा केला जातो व रक्तातील उर्वरित द्रव्य आपल्या शरीरात सोडले जातात. हे एकाचवेळी होत असून अवघ्या दीड तासाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे कोविडमधून मुक्त झालेल्यांनी तसेच अन्टिबॉडी तयार झालेल्यांनी प्लाज्मा दान करावे, असे आवाहन श्री. राम जोशी यांनी केले आहे.