Published On : Fri, Nov 15th, 2019

बालदिनी आप्तांच्या गळाभेटीने कारागृह गहिवरले

Advertisement

नागपूर: मध्यवर्ती कारागृहात तुरुंगाधिकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नातून बालदिनी आप्तांच्या गळाभेटीने कैदी आई-वडीलांसह त्यांची मुले गहिवरली. कारागृहातील कैद्यांना काही कारणास्तव संचित किंवा अभिवचन रजेवर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भेटीसाठी जाता येत नाही.

त्यामुळे ते मानसिक दृष्ट्या खचून जातात. त्याकरिता त्यांच्या मुलांशी प्रत्यक्ष भेट व्हावी, या उद्देशाने बालदिनाचे औचित्य साधून मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने आज प्रत्यक्ष ‘गळाभेट’ कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी 62 कैद्यांच्या 111 मुलांनी आपल्या आई किंवा वडीलांची भेट घेतली.

या कार्यक्रमास कारागृहाचे अधीक्षक अनूप कुमार कुमरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी व्ही. सी. वानखेडे, कारखाना व्यव्यस्थापक आर.आर. भोसले, तुरुंगाधिकारी विठ्ठल शिंदे, योगेश पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते महादेव डोंगरे व मीना लाटकर आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या भेटी दरम्यान बंद्यांनी कारागृहातील उपहारगृहातून खरेदी केलेला खाऊ मुलांना दिला. या अत्यंत भावनिक कार्यक्रमात मुलांनी आपल्या आई-वडीलांसोबत आनंदाने वेळ घालविला. कारागृह प्रशासनाच्या वतीने वर्षातून दोनदा नियमितपणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते