Published On : Fri, Nov 15th, 2019

बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सवात रंगल्या मारुती चितमपल्लींशी गप्पा

– ‘केशराचा पाऊस’ कार्यक्रमातून मांडला निसर्गानुभव

नागपूर : गोंदिया म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला जिल्हा. गोंदिया वनराईने तर समृद्ध आहेच, सोबत वन्यजीवसृष्टीने देखील समृद्ध असा आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र तर या जिल्ह्याचा मुकुटमणी आहे. सोबतच जिल्ह्यात हाजराफॉल, इटीयाडोह, चोरखमारा, बोदलकसा, चूलबंद यासह अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना व तीर्थक्षेत्रांना पर्यटकांनी भेट द्यावी आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील आहे.

तिरोडा तालुक्यातील निसर्गरम्य अशा बोदलकसा या जलाशयाच्या काठावर, गर्द वनराईत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांच्या निवासाच्या दृष्टीने सुदंर असे रिसॉर्ट बांधले आहे. निसर्गाच्या सानिध्यात बांधलेल्या या रिसॉर्टकडे आता पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अभ्यासू, लोकाभिमुख व प्रयोगशील अधिकारी अभिमन्यू काळे हे 2 डिसेंबर 2016 ते मे 2018 या कालावधीत गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी गोंदिया महोत्सव, सेंद्रिय शेतीला चालना, वृक्षांना पेन्शन, स्वदेशी वृक्षांची लागवड आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. श्री. अभिमन्यू काळे यांच्या रूपाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला एक प्रयोगशील, निसर्ग व वन्यजीवप्रेमी सनदी अधिकारी मिळाल्यामुळे पर्यटन विकासाला गती मिळाली आहे. अनेक उपक्रम ते पर्यटकांसाठी राबवीत आहेत.

श्री. काळे यांच्या संकल्पनेतून 11 नोव्हेंबर रोजी बोदलकसा येथील पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टच्या परिसरात बोदलकसा जलाशयाच्या काठावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने पौर्णिमा महोत्सवाचे नाविन्यपूर्ण आयोजन करण्यात आले. पौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ, थोर वन्यजीव साहित्यिक तथा निसर्गमित्र मारुती चितमपल्ली यांच्याशी त्यांनी लिहिलेल्या ‘केशराचा पाऊस’ या पुस्तकावर आधारित निसर्गानुभावाच्या गप्पांची मैफिल चांगलीच रंगली. प्रसिद्ध निवेदिका श्रीमती कांचन संगीत यांनी घेतलेली श्री. चितमपल्ली यांची मुलाखत उपस्थित पर्यटक, विद्यार्थी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी व पत्रकारांना थेट निसर्गाच्या आणि वन्यजीवांच्या सानिध्यात घेवून गेली.

बोदलकसा येथे आयोजित करण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, संचालक दिलीप गावडे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक श्री. रामानुजम, वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, सिद्ध समाधी योग पुणेचे मनोज गोखले, पर्यटन विकास महामंडळाचे लेखाधिकारी श्री. कांबळे, वन्यजीवप्रेमी डॉ. राजेंद्र जैन, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर, वर्धा येथील मानद वन्यजीव रक्षक कौशल मिश्र, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बुद्धदास मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या निसर्गानुभवाबाबत बोलताना श्री. चितमपल्ली म्हणाले की, मी ध्यानाचा अभ्यास केला आणि नियमित ध्यान करीत असल्यामुळे वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी या ध्यानाचा उपयोग झाला. रानम्हशीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, या म्हशी रानटीच आहेत, पण त्या म्हशीच्या प्रजातीमधील आहेत. लगतच्या छत्तीसगड राज्याच्या बस्तर जिल्ह्यातील घनदाट जंगलातून या म्हशींचे कळप गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात चरण्यासाठी येवून निघून जातात. मेळघाटात आदिवासी बांधव रानकंदाचे डोळे जमिनीत लावतात. पुढे त्या कंदाचा आकार घागरी एव्हढा होतो. दुष्काळाच्या काळात आदिवासी रानकंद खावून जगतो. त्यामुळे त्यांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी या रानकंदाची मदत होते, असे त्यांनी सांगितले.

केशराच्या पावसाच्या अनुभवाबद्दल बोलताना श्री. चितमपल्ली म्हणाले, या पावसाचा अनुभव घेण्यासाठी मेळघाटातील खोल जंगलात असलेल्या कोकटू येथील ब्रिटीशकालीन विश्रामगृहाच्या परिसरात जावे लागेल. डिसेंबर महिन्यात रात्री 1 ते 3 वाजेदरम्यान या पावसाचा अनुभव घेता येतो. आपल्या अंगावरील कपड्यांवर केशरी रंगाचा सुगंधी पाऊस पडल्याचे दिसून येते. मेळघाटात 150 पेक्षा जास्त गावे रिठी अर्थात उजाड आहेत.

या रिठी गावांचे वैशिष्ट्य म्हणजे या गावांत आता बोरांच्या झाडांचे वन आहे. रिठी गावांबाबत अधिक माहिती देतांना श्री. चितमपल्ली म्हणाले, ही गावे लहान असायची. गावातील लोकांकडे पाळीव जनावरे असायची. वाघ, बिबटे पाळीव जनावरांना मारून खायचे. या दहशतीमुळे ग्रामस्थ स्थलांतरित व्हायचे. गावे रिठी झाली की तेथे मोठ्या प्रमाणात उंदीर, घुशी व्हायच्या. मग उंदीर व घुशींना खाण्यासाठी कोल्ह्यांचे कळप तेथे जमा व्हायचे. उंदीर व घुशी खावून ते रात्रभर तेथेच झोपायचे.

सकाळी जाताना कोल्ह्यांचे कळप तेथेच विष्टा टाकायचे. कोल्ह्यांनी खाल्लेली बोरे पचत नसल्याने त्यांच्या विष्टेतून प्रक्रिया होवून तिथेच बोरांच्या बिया बाहेर पडायच्या. त्यामुळे विष्टेतून पडलेले बी जसेच्या तसे तेथेच पडायचे आणि पहिल्या पावसात ते झपाट्याने उगवायचे. विष्टेतून बियांवर प्रक्रिया झाल्यामुळे तिची उगवण क्षमता ही 100 टक्के असायची आणि झाड लगेच मोठे व्हायचे. यातूनच ही बोरींची जंगले वाढली. बोरीच वन जिथे दिसेल, ते निश्चित समजायचे की ते रिठी गाव आहे.