Published On : Fri, Nov 15th, 2019

बालकांचे उज्ज्वल भविष्य घडवा – बोरखडे

Advertisement

नागपूर : आजची लहान बालके ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. यामुळे बालकांचे उज्ज्वल भविष्य घडवा. या बालकांच्या जडण-घडणीसाठी चालविले जाणारे विशेष उपक्रम त्यांना निश्चितच पथदर्शक ठरतील, असा विश्वास महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त एम. डी. बोरखडे यांनी व्यक्त केला.

.
जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानात आज आयोजित करण्यात आलेल्या ‘चाचा नेहरू बाल महोत्सव 2019-20’ चे उद्घाटन एम. डी. बोरखडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य डॉ. वासंती देशपांडे, बाल न्याय मंडळाचे सदस्य जोगी, सहाय्यक कामगार आयुक्त धुर्वे, पोलिस निरीक्षक तिडके, जिल्हा परीविक्षाधीन अधिकारी धनंजय उबाळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपायुक्त बोरखडे मार्गदर्शन करतांना म्हणाले, सुधारगृहाच्या मुलांसाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविल्या जातात. या सर्व उपक्रम, स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा. स्पर्धेमुळे आपल्याला आपण नेमके कोठे आहोत, याची तर जाणीव होतेच शिवाय आपल्यातील सुप्त कलागुणांना देखील वाव मिळतो. यासाठी विविध स्पर्धांना सामोरे जा. स्वत:ची परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे. याची जाणीव ठेवून मेहनत करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. परिस्थिती कायम बदलत राहते. यामुळे केवळ भूतकाळाबद्दल विचार करीत बसण्यापेक्षा भविष्याचा विचार करा. जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सुधारगृहातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चालविलेले अभिनव उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहेत. आपल्याला घरातील एक मूल सांभाळणे कठीण जाते. अशा वेळेला विभिन्न परिस्थितीतून आलेल्या मुला-मुलींचा सांभाळ करणे, जिकरीचे तसेच आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे म्हणाल्या, जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने शासकीय, स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यात येतो. त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरू बाल क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन संरक्षण अधिकारी श्रीमती मिनल कुहिते यांनी तर आभार शासकीय अनुरक्षण गृहाचे अधीक्षक दीपक बानाईत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.