Published On : Wed, Mar 21st, 2018

आ. आव्हाडांनी मागितली राजदंड मतदारसंघात नेण्याची परवानगी


मुंबई: पूर्वी राजदंडाला प्रचंड मानसन्मान होता. मात्र, आता राजदंडाचे वारंवार अवमूल्यन होत आहे, असा टोला लगावून माझ्या मतदारसंघातील अबालवृद्धांना राजदंड दाखवण्यासाठी बाहेर नेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी करुन सरकारमध्ये राहून राजदंड पळवणार्‍या सेनेला अप्रत्यक्ष चपराक लगावली आहे.

अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा मागे घेण्याची मागणी सत्तारूढ शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केली. विधानसभेत याप्रश्नी गदारोळ सुरू असतानाच अचानक सेनेचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सभागृहातील राजदंड पळवला. सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने केलेल्या या कृत्याचा आ. जितेंद्र आव्हाड यांनी शालजोडीतून चांगलाच समाचार घेतला आहे.

आ. आव्हाड यांनी विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना पत्र दिले असून या पत्रामध्ये राजदंड मतदारसंघात नेण्याची मागणी केली आहे. त्यांनी विधानसभाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रामध्ये, ‘आम्ही जेव्हाा सभागृहात प्रवेश केला. त्यावेळेस राजदंडाला प्रचंड मानसन्मान असल्याचे सांगण्यात आले होते.

राजदंड उचलला तर सदस्याला निलंबित व्हावे लागायचे. आता तर वारंवार राजदंडाचे अवमूल्यन होत आहे. सदरची परिस्थिती पाहता, माझ्या मतदारसंघातील अबालवृद्धांनी विधानसभेतील राजदंड पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तरी आपण, सभागृहातील राजदंड बाहेर नेण्याची परवानगी द्यावी, अबालवृद्धांना राजदंड दाखवल्यानंतर दुसर्‍या दिवशी सन्मानाने राजदंड सभागृहामध्ये परत आणला जाईल. कृपया या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, ही विनंती’ , असे नमूद केले आहे.