नागपूर : वर्धा रोडवरील एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्थानकाला लागून असलेल्या परिसराच्या दुरवस्थेचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर विकसित करून सुशोभित करण्यात आलेल्या या परिसराची देखभाल न झाल्याने काही दिवसांतच त्याची अवस्था बिकट झाली होती. परिसरात गवत आणि झुडपे वाढली होती. तसेच मद्यपी आणि असामाजिक तत्त्वांचा वावर वाढल्याने नागरिकांना बसण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी असलेली जागा असुरक्षित बनली होती.
या दुरवस्थेकडे एका नागरिकाने व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. या व्हिडिओची दखल घेत नागपूर महानगरपालिका आणि स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखारे यांच्या पुढाकाराने परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानंतर बागकाम, हिरवळ विकसित करणे आणि उद्यानाशी संबंधित इतर सुशोभीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे काही काळापूर्वी आकर्षक स्वरूप प्राप्त झालेल्या या परिसराला पुन्हा नवे रूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांनी शहराच्या स्वच्छतेबाबत आणि सार्वजनिक मालमत्तेच्या जतनाबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. कारण शहराचे सौंदर्य टिकवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे.




