
नागपूर : नागपुरातील मोमिनपुरा परिसरात खंडणीखोराचा दहशत निर्माण करण्याचा प्रकार समोर आला आहे. नाश्त्याची हातगाडी चालवणाऱ्या एका तरुणाकडे चक्क चाकूचा धाक दाखवून दरमहा १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास परिसरात हातगाडी लावू देणार नाही, तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सैयद अली हे मोमिनपुरा परिसरातील त्यांच्या नाश्ता सेंटरसमोर उभे असताना आरोपी ऐहतेश्याम रफीक खान ऊर्फ बहेरा तेथे पोहोचला. नशा करण्यासाठी त्याने सैयद अली यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली.
मात्र, पैसे नसल्याचे सांगताच आरोपीने कथितरीत्या चाकू काढून त्यांना धाक दाखवला. येथे नाश्त्याची हातगाडी चालवायची असेल, तर दरमहा १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा हातगाडी लावू देणार नाही, अशी धमकी दिली. एवढेच नव्हे, तर पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारानंतर पीडित सैयद अली यांनी तहसील पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी ऐहतेश्याम रफीक खान ऊर्फ बहेरा याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून तहसील पोलीस पुढील तपास करीत आहेत.



