
नागपूर : नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील कॉटन मार्केटमध्ये दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका मजुराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत ५० ते ५५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह असल्याचे समजून गोणीत भरला आणि लोखंडी पुलाजवळील नाल्यात फेकून दिले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केट परिसरातील लोखंडी पुलाजवळ घडली. मृत व्यक्तीची ओळख टार्जन नावाने झाली असून तो अंदाजे ५० ते ५५ वर्षांचा होता. परिसरात कचरा वेचून तो आपला उदरनिर्वाह करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या रात्री टार्जन हा चार आरोपींसोबत दारू पिण्यासाठी गेला होता. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. टार्जनने आरोपींना शिवीगाळ केल्याने वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर चौघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली.
यादरम्यान धर्मा नामक आरोपीने टार्जनच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जोरदार प्रहार केला. त्यामुळे तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. त्यानंतर इतर आरोपींनीही त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, टार्जन शुद्धीवर येत नसल्याचे पाहून आरोपींनी तो मृत झाल्याचे समजले. त्यानंतर त्याला गोणीत भरून लोखंडी पुलाजवळील नाल्याच्या पाण्यात फेकून दिले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा संशय आहे.
या घटनेची सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान हत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी हत्या आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी मोहम्मद इस्लाम आणि शशिकांत जामठावार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर किशोर आणि धर्मा नामक अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.



