नागपूर : मिठाई, ड्रायफ्रूट्स आणि नमकीनच्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या हल्दिराम कंपनीच्या मालकांना आर्थिक फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. कमल अग्रवाल यांना 76 टक्के शेअर्स मिळतील, अशा आमिषाने सुमारे 9 कोटी 55 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर उद्योगजगतात खळबळ उडाली आहे.
नुकतेच नागपूर व नवी दिल्ली येथील अग्रवाल कुटुंबाच्या दोन वेगवेगळ्या हल्दिराम कंपन्यांचे विलीनीकरण झाले. या नव्या युनिटचे एकूण व्हॅल्युएशन तब्बल 84 हजार कोटी रुपयांवर गेले. याच दरम्यान, एका आरोपी कुटुंबाने कमल अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीच्या बदल्यात 76 टक्के हिस्सेदारी देण्याचं आश्वासन दिलं.
प्रथमदर्शनी व्यवहार योग्य वाटल्याने अग्रवाल यांनी गुंतवणूक केली. मात्र, यानंतर त्यांना ना अपेक्षित नफा मिळाला ना शेअर्स. त्यानंतर त्यांनी संशय घेऊन चौकशी सुरू केली असता, संबंधित कंपनीने बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठी उलाढाल आणि नफा दाखवल्याचे उघड झाले.
या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल होताच आरोपी लालानी पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा फरार झाले आहेत. कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, आरोपींविरुद्ध याआधीही विविध आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी चौकशा सुरू होत्या. अशा प्रकारांमध्ये बनावट कंपन्या उभ्या करून मोठ्या उलाढालीचे खोटे आकडे दाखवले जातात, आणि त्याद्वारे उद्योजकांची फसवणूक केली जाते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
या घटनेने उद्योगजगतात सावधगिरीचा इशारा देत गुंतवणूक करताना अधिक पारदर्शकता आणि काळजी घेण्याची गरज अधोरेखित केली आहे.