मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संबंधित एक खाजगी व्हिडीओ माध्यमांसमोर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शिरसाट त्यांच्या बेडरूममध्ये दिसतात आणि त्यांच्या शेजारी एक मोठी बॅग ठेवलेली आहे. ही बॅग पैशांनी भरलेली असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर स्वतः संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. “हा व्हिडीओ माझा खाजगी क्षण आहे. मी प्रवासातून नुकताच परत आलो होतो. त्या बॅगेत फक्त कपडे होते, काहीही लपवण्यासारखं नाही,” असं शिरसाट म्हणाले. त्यांनी यावेळी व्हिडीओतील परिस्थिती स्पष्ट करत सांगितलं की, “मी बनियनवर होतो, माझा कुत्रा शेजारी होता, आणि ती बॅग प्रवासाची होती. इतके पैसे बॅगेत ठेवण्याइतका मी मूर्ख नाही.”
त्यांनी पुढे विरोधकांवर निशाणा साधताना म्हटलं, “विरोधकांना पैसेच दिसतात, वास्तव नाही. मी काही लपवत नाही, घरात अलमारी नाही का, की सगळं बॅगेतच ठेवणार?”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकांच्या बॅगांवरही यापूर्वी अशाच प्रकारच्या शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या, असा संदर्भ देत शिरसाट म्हणाले की,विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ते असल्या निराधार आरोपांवर उतरत आहेत.
या संपूर्ण प्रकारामुळे पुन्हा एकदा खाजगी आयुष्य आणि राजकीय आरोपांमधील सीमारेषा अधोरेखित झाली आहे. व्हिडीओतील बॅगेचा मुद्दा नेमका काय वळण घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.