मुम्बई – कुर्ला एल वॉर्डातील साकीनाका येथील खैरानी रोड ब्रिजचे काम 19 महिन्यापासून रखडलेले होते. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर एक दिशा मार्ग रविवारी सुरु होणार आहे. यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
स्थानिक नागरिकांनी रखडलेल्या कामाबाबत अनिल गलगली यांसकडे संपर्क करत प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका उपायुक्त संजय दराडे यांसकडे दिनांक 8 ऑक्टोबर 2020 रोजी विविध प्रश्न संबंधित बैठक आयोजित केली होती. या बैठकीत रखडलेल्या खैरानी रोड ब्रिज कामाबाबत श्री दराडे यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांस सुचना केल्यानंतर कामास गती मिळाली. जल खात्याने जलवाहिनी स्थलांतर कामात स्वारस्य दाखवून नवीन 300 एमएमची जलवाहिनी टाकली. अनिल गलगली यांच्या मते सेवा वाहिन्यामुळे कामास वेळ लागला आणि अजूनही आव्हाने आहेत. येत्या रविवारी एक दिशा मार्ग सुरु करण्यात येत असून त्यानंतर उर्वरित काम सुरु होईल.
खैरानी रोड ब्रिज 23 मार्च 2019 रोजी तोडला गेला होता. 26 जुलै 2019 रोजी कार्यादेश जारी केला गेला असून एपीआय सिव्हिलकॉन कंपनीला 5 कोटीचे कंत्राट मिळाले असून 21 जानेवारी 2021 पर्यत उर्वरित कामही पूर्ण केले जाईल.
