Published On : Thu, Sep 10th, 2020

मनपातील कोरोनाबाधितांची संख्या दोनशेवर

Advertisement

१२ जणांचा मृत्यू : विनाकारण मनपामध्ये येणे टाळा

नागपूर: शहरात सर्वत्र कोव्हिडचा प्रादुर्भाव पसरत असतानाच नागपूर महानगरपालिकेमध्येही धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. मनपा मुख्यालयासह झोन कार्यालय, विविध विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचा-यांसह आतापर्यंत २२६ जण कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

मनपा कार्यालय प्रत्येक कार्यालयीन दिवशी सुरू असल्याने अनेक जण संपर्कात येतात. त्याचाच फटका येथील उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्त अशा वरीष्ठ अधिका-यांसह २२६ जणांना बसला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. मनपामध्ये कोणत्याही महत्वाच्या कामाविना येण्याचे टाळावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

कोव्हिडचा सर्वाधिक संसर्ग मनपाच्या शिक्षण विभागात झाला आहे. आतापर्यंत शिक्षण विभागातील ३६ अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून यापैकी ४ जणांना जीव गमवावा लागला आहे. अशीच स्थिती गांधीबाग झोन कार्यालयातील असून येथील ३४ पॉझिटिव्ह रुग्णांमधून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हनुमाननगर झोनमध्येही २५ कर्मचारी कोरोनाबाधित आहेत तर दोघांचा मृत्यू झाला. याशिवाय मनपा मुख्यालयातील अग्निशमन विभागातील ३६, धरमपेठ झोन कार्यालयातील २५, सामान्य प्रशासन विभागातील २१, कर व कर आकारणी विभागातील १२, घनकचरा व्यवस्थापन विभागातील ८, आसीनगर झोन कार्यालयातील ७, नगररचना विभागातील ५, कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५, शेंडे नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ४, हुडकेश्वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २, क्रीडा व सांस्कृतिक विभागातील २, जाहिरात विभाग, जयताळा माध्यमिक शाळा आणि झोपडपट्टी भाडे पट्टा वाटप विभागातील प्रत्येकी १ जण कोव्हिड पॉझिटिव्ह आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि मुख्य म्हणजे विनाकारण फिरणे टाळणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास, जिभेला चव न येणे, वास न येणे अशी लक्षणे आढळल्यास किंवा कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तातडीने आपल्या नजीकच्या मनपा कोव्हिड चाचणी केंद्रात जाउन चाचणी करून घ्यावी. कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह असेल आणि लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी झोनच्या कॉल सेंटरवर फोन करून मार्गदर्शन घ्यावे. यासाठी 0712-2551866, 0712-2532474, 18002333764 हे कॉल सेंटरचे क्रमांक आहेत. आपल्याला रुग्णालयात दाखल व्हायचे असेल आणि कुठल्या रुग्णालयात बेड्‌सची उपलब्धता आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर 0712-2567021 या क्रमांकावर कॉल करावे. या व्यतिरिक्त झोनलस्तरावरही कॉल सेंटर सुरु करण्यात आले आहेत या क्रमांकावरही फोन करुन माहिती घेता येईल. आपल्यामुळे इतरांचा जीव धोक्यात जाऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीची वागणूक ठेवावी, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात येत आहे.

महापौर कार्यालयालाही कोरोनाचा विळखा
शहराचे प्रथम नागरिक महापौर संदीप जोशी यांच्या वाहनचालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापौर कार्यालयातील सर्वच कर्मचा-यांची चाचणी करण्यात आली. गुरूवारी (ता.१०) त्याचा अहवाल आला असून महापौरांचे स्वीय सहायकही कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महापौर संदीप जोशी आणि कार्यालयातील इतर सर्व कर्मचारी नियमानुसार गृहविलगीकरणामध्ये राहतील. दरम्यान महापौर संदीप जोशी यांच्यासह सर्व कर्मचा-यांचे दैनंदिन कामकाज घरून सुरू राहिल.

 

अ.क्र. विभागाचे नाव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या मृत्यू
गांधीबाग झोन ३४
कर व कर आकारणी विभाग १२
घनकचरा व्यवस्थापन विभाग
शिक्षण विभाग ३६
आसीनगर झोन
नगररचना विभाग
हनुमाननगर झोन २५
जाहिरात विभाग
सामान्य प्रशासन विभाग २१
१० जयताळा माध्यमिक शाळा
११ झोपडपट्टी भाडे पट्टा वाटप
१२ शेंडे नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
१३ हुडकेश्वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
१४ क्रीडा व सांस्कृतिक विभाग
१५ धरमपेठ झोन २५
१६ कपिल नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
१७ अग्निशमन विभाग ३६
एकूण २२६ १२