Published On : Wed, Aug 19th, 2020

उपद्रव शोध पथकाने कठोरतेसह संवेदनशीलताही दाखवावी – महापौर संदीप जोशी यांचे आदेश

Advertisement

नागपूर : शहरातील नागरिकांना शिस्त लागावी व आपले नागपूर शहर स्वच्छ, सुंदर राहावे यासाठी नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक कार्य करते. उपद्रव पसरवून शहर विद्रूप करणाऱ्यांवर कारवाईद्वारे पथकाचे जवान चाप लावण्याचेही काम करीत आहेत. मात्र ही कारवाई करीत असताना किंवा जनतेशी कठोरतेने वागत असताना संवेदनशीलताही जपली जावी. कोव्हिडच्या काळात सर्वच अडचणीत आहेत. त्यामुळे कारवाई करीत असताना माणुसकी जागरूक ठेवून संवेदनशीलताही दाखवावी, असे आदेश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

नागपूर शहरातील उपद्रव शोध पथकाच्या सर्व झोन प्रमुखांची बुधवारी (ता.१९) महापौर संदीप जोशी यांनी बैठक घेतली. बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके उपस्थित होते.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पथकाबद्दल मांडण्यात आलेल्या अनेक तक्रारींचे यावेळी निराकरण करण्यात आले. चर्चेमध्ये काही तक्रारींत खालचे कर्मचारी दोषी आढळले. अशा दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. याशिवाय येत्या १० दिवसात पथकाची झोननिहाय कारवाई तपासण्यात येईल. त्यामध्ये दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी महापौरांनी दिला.

उपद्रव शोध पथकामध्ये २०१ जणांना मंजुरी मिळाली होती. सध्या १८० जण कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे इतर २१ जणांची भरतीही ताबडतोब करण्यात यावी, असे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनीही उपद्रव शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीसंदर्भात वारंवार नगरसेवक आणि नागरिकांमार्फत तक्रारी येत असल्याबाबत नाराजी वर्तविली.

उपद्रव शोध पथकाद्वारे आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शहरातील दहाही झोनमधील नियमांचे उल्लंघन करून कोव्हिडच्या धोक्याला आमंत्रण देणाऱ्या ७५८२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. मास्क न लावणे, बाजारामध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे पालन न करणे अशा बाबींमध्ये कारवाई करून मनपाने ५ जून ते १८ ऑगस्ट २०२० या दरम्यान ७५८२ जणांकडून ६६ लाख ४० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मास्क लावण्याचा नियम न पाळणा-यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. ५ जून २०२० पासून ही कारवाई सुरू करण्यात आली असून १८ ऑगस्ट २०२० पर्यंत मास्क लावणा-या ५४३६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांकडून २०० रुपये दंड याप्रमाणे १० लाख ८७ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.

बाजारांमध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरूवातीला १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश होते. त्यानुसार ५ जून ते १८ जुलै २०२० दरम्यान १३८० दुकानांवर कारवाई करून १ हजार रुपये या प्रमाणे एकूण १३ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करण्यासंदर्भात १७ जुलै २०२० रोजी मनपाद्वारे नवीन आदेश काढण्यात आले. या आदेशानुसार सम व विषम तारखांच्या नियमांचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा ८ हजार रुपये व तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड वसूल करण्याचे निर्देशित करण्यात आले. त्यानुसार १८ जुलैपासून नवीन नियमानुसार कारवाई करण्यात आली. १८ ऑगस्ट पर्यंत ६९५ दुकानांवर पहिल्यांदा नियमभंगाची कारवाई करून ५ हजार रुपये या प्रमाणे एकूण ४४ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दुसऱ्यांदा झालेल्या कारवाईत ६ जणांकडून ८ हजार रुपये याप्रमाणे ४८ हजार रूपये दंड प्राप्त झाले. तर तिसऱ्यांदा नियम तोडणाऱ्या ६५ दुकानांवर कारवाई करीत १० हजार रुपये याप्रमाणे एकूण ६ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सम व विषम तारखांसंदर्भात जुन्या नियमानुसार १३८० (१३ लाख ८० हजार रुपये दंड) व नवीन नियमानुसार एकूण ७६६ जणांवर (४१ लाख ७३ हजार रुपये दंड) कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत एकूण ५५ लाख ५३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement