Published On : Wed, Aug 19th, 2020

गर्दी टाळा, घरीच ‘बाप्पा’चे विसर्जन करा!

महापौर संदीप जोशी यांचे कळकळीचे आवाहन : गणेश उत्सव तयारी आढावा बैठक

नागपूर : नागपूर शहरासोबतच संपूर्ण देश आणि जगावर असलेले कोरोनाचे संकट विघ्नहर्ता श्रीगणेश दूर करेल, ही आशा प्रत्येक भाविकाला आहे. मात्र, यंदाचा उत्सव साजरा करताना संयम बाळगणे आणि नियम पाळणे गरजेचे आहे. विसर्जनसमयी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी सर्वच घरगुती गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करावे, असे कळकळीचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या गणेशोत्सवाची प्रशासनातर्फे काय तयारी करण्यात आली आहे आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग कसा असेल याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने बुधवारी (ता. १९) महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, घनकचरा व्यवस्थापन व उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, शासनाच्या परिपत्रकानुसार यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करतानाही काही नियम पाळणे गरजेचे आहे. मूर्ती चार फुटाच्या वर नसावी आणि सार्वजनिकरीत्या कुठलेही कार्यक्रम होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यायची आहे. पेंडालवरही नियंत्रण असून यासाठी प्रशासनाचा कस लागणार आहे. प्रशासनाने ह्या सर्व नियमांचे पालन मंडळांकडून होते अथवा नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. घरगुती गणेशाचे विसर्जनही यंदा भाविकांनी घरीच करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. उपमहापौर मनीषा कोठे यांनी मंडळांनी नियम पाळावे आणि गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. स्थायी समितीचे सभापती विजय झलके यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. तत्पूर्वी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी नागपूर महानगरपालिकेने गणेशोत्सवासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशाची माहिती दिली.

स्वयंसेवी संस्थांनी मांडल्या सूचना
यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी सूचना मांडल्या. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी म्हणाले, घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करताना ती मूर्ती पीओपीची नसेल याची काळजी घ्यावी लागेल. पीओपी मूर्ती संदर्भात असलेले नियम दुकानदारांनीसुद्धा पाळायला हवे. वृक्ष संवर्धन समितीचे बाबा देशपांडे यांनी यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची सूचना मांडली. किंग कोब्रा ऑर्गनायझेशनचे अरविंदकुमार रतुडी यांनी निर्माल्य गोळा करून त्याचे कम्पोस्ट खत तयार करण्याची सूचना केली. मात्र, नागपुरात मनपातर्फे ही व्यवस्था पूर्वीची असल्याची माहिती ग्रीन व्हिजीलचे कौस्तुभ चॅटर्जी यांनी दिली.

घरगुती गणेश विसर्जनासाठी सोसायट्यांनी गणेश विसर्जनाची यथोचीत व्यवस्था सोसायटीमध्ये करावी, अशी सूचनाही काही प्रतिनिधींनी केली. रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनचे दिनेश नायडू यांनी सर्व तलावात मूर्ती ‍ विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात यावी , असे आग्रही प्रतिपादन केले. यावेळी चंदन निमजे, विजय लिमये, स्पर्शचे कपिल आदमने, प्रणय भंडाडे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सुरभी जयस्वाल, निसर्ग विज्ञान मंडळाचे दीपक शाहू, प्रा. विजय घुगे आदी उपस्थित होते.