Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Aug 19th, 2020

  नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता ‘कोव्हिड हॉस्पीटल्स’

  १८७६ बेड्‌सची उपलब्धता : केंद्रीय कॉल सेंटर कार्यान्वित, ३४ केंद्रांवर चाचणी

  नागपूर : शासकीय रुग्णालयांसोबतच आता कोव्हिड-१९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही मान्यता देण्यात आली आहे. नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णत: कोव्हिड हॉस्पीटल्स बनले असून या संपूर्ण रुग्णालयात एकूण १८७६ बेड्‌स उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.

  नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व रुग्णालयांचे स्वतंत्र आदेश काढून या सर्व रुग्णालयांना कोव्हिड हॉस्पीटल म्हणून मान्यता दिली आहे. या संपूर्ण रुग्णालयांमध्ये एकूण १८७६ एकूण बेड्‌सची उपलब्धता आहेत. यामध्ये २५६ बेडस्‌ अतिदक्षता कक्षातील आहेत. ऑक्सीजनची उपलब्धता असलेली ९९७ बेड्‌स आहेत तर ६२३ ऑक्सीजन नसलेले बेड्‌स आहेत. संपूर्ण रूग्णालय मिळून एकूण ९० व्हेन्टिलेटरची व्यवस्था आहे.

  हे राहतील आता कोव्हिड हॉस्पीटल
  ज्या १६ हॉस्पीटल्सला कोव्हिड हॉस्पीटल म्हणून मान्यता मिळाली यामध्ये ऑरेंज सिटी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर, सावरकर चौक (१५० बेड्‌स), सेव्हन स्टार हॉस्पीटल, जगनाडे चौक (१०५), श्री भवानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्युट, पुनापूर (११०), गंगा केअर हॉस्पीटल, रामदासपेठ (१०५), श्री राधाकृष्ण हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्युट, पूर्व वर्धमान नगर (१५०), लता मंगेशकर हॉस्पीटल, सीताबर्डी (१५०), कुणाल हॉस्पीटल, मानकापूर (१००), होप हॉस्पीटल, टेका नाका (१००), सेंट्रल हॉस्पीटल, रामदासपेठ (५०), वोक्हार्ट हॉस्पीटल, गांधीनगर (४५), रेडिअन्स हॉस्पीटल, वर्धमाननगर (६५), वोक्हार्ट हॉस्पीटल, नॉर्थ अंबाझरी रोड (११८), किंग्जवे हॉस्पीटल, कस्तुरचंद पार्क जवळ (२२८), अलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल प्रा.लि.,मानकापूर (२००), न्यू एरा हॉस्पीटल, टेलिफोन एक्स्चेंज चौक (१००), व्हिम्स हॉस्पीटल (१००) या रुग्णालयांचा समावेश आहे.

  हॉस्पीटल्सच्या जबाबदाऱ्या काय?
  ज्या हॉस्पीटल्सना आता नवे कोव्हिड हॉस्पीटल म्हणून मान्यता देण्यात आली आहे, त्या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाप्रति काही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयात जो कोणी रुग्ण येईल तो जर अतिगंभीर असेल तर त्याला सर्वप्रथम उपचार देणे, आवश्यकता असेल तर व्हेंटिलेटरवर ठेवणे आणि त्या रुग्णाला स्टेबल करणे, हे त्या रुग्णालयाचे प्रथम कर्तव्य राहील. ज्या रुग्णांकडे थर्ड पार्टी विमा आहे, त्यांच्यावर उपचार करून क्लेमसाठी रुग्णालयानेच विमा कंपनींना पाठवावे. शासनाच्या परिपत्रकानुसार ८० टक्के बेड्‌स हे आरक्षित ठेवावे आणि त्यावर शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारावे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना हे बेड्‌स पूर्ण होईपर्यंत तेथेच दाखल करावे. त्यानंतरच २० टक्के बेड्‌स ज्यावर रुग्णालयाच्या दरानुसार बिल आकारता येईल, तेथे दाखल करावे.

  केंद्रीय कॉल सेंटर
  रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने कुठे जावे, कुठल्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, याबाबत रुग्णांमध्येच संभ्रम असतो. मात्र, नागपूर महानगरपालिकेने आता यापुढे ही व्यवस्था केंद्रीय पद्धतीने केली आहे. मनपात सध्या असलेल्या कोव्हिड कॉल सेंटरचा विस्तार करीत केंद्रीय कॉल सेंटर (Centralised Call Center) कार्यान्वित केले आहे. त्याचा क्रमांक ०७१२-२५६७०२१ असा आहे. जो रुग्ण पॉझिटिव्ह आला त्याने सर्वप्रथम संबंधित क्रमांकावर याबाबत माहिती द्यावी. तेथून त्यांनी होम आयसोलेशन अथवा रुग्णालयातील उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. या कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना खासगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयांमध्ये किती बेड उपलब्ध आहे, त्यांना कुठे भरती करु शकतो याबद्दल माहिती दिली जाणार आहे. या कॉल सेंटरची जबाबदारी मनपाचे डॉ. लाड व इतर शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी (ता. १९) केंद्रीय कॉल सेंटरची पाहणी केली. या व्यवस्थेमुळे रुग्णांचा त्रास कमी होईल आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार कुठे घ्यायचा याविषयी निर्माण होणारा संभ्रम दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई उपस्थित होते.

  ३४ कोव्हिड चाचणी केंद्र
  ज्या व्यक्तीला कोव्हिडसदृश लक्षणे आहेत अथवा जे व्यक्ती पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी तातडीने चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. यासाठी मनपाने झोननिहाय ३४ कोव्हिड चाचणी केंद्राची व्यवस्था केली आहे. सहा कोव्हिड चाचणी केंद्रावर आर.टी.-पीसीआर चाचणीची व्यवस्था आहे. आर.टी.पी.सी.आर. चाचणी ज्या केंद्रांवर होते त्या केंद्रांमध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्र (आर.पी.टी.एस.), लॉ कॉलेज वसतिगृह, रवि भवन, मॉरिस कॉलेज वसतिगृह, पाचपावली पोलिस वसाहत आणि राज नगर या केंद्रांचा समावेश आहे. येथे सकाळी १० ते २ या वेळेत चाचणी सुरू राहील. अन्य २८ केंद्रांमध्ये जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, फुटाळा, तेलंगखेडी, हजारी पहाड प्राथमिक आरोग्य केंद्र, बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र, नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, बिडीपेठ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, डिप्टी सिग्नल प्राथमिक आरोग्य केंद्र, पारडी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, झिंगाबाई टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र, हुडकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र, नरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सोमलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, नारा प्राथमिक आरोग्य केंद्र, कपिल नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंडेनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, डायग्नोस्टिक सेंटर महाल प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी बॉईज होस्टल कळमना, कॉटन मार्केट प्राथमिक आरोग्य केंद्र, के.टी. नगर प्राथमिक आरोग्य केंद्र या २८ केंद्रांचा समावेश आहे. येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत चाचणी करता येईल.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145