
नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभाग आणि विद्युत विभागाद्वारे कोराडी येथील आपली बसच्या ई-बस डेपो येथे ३३केव्ही/०.४३३ केव्हीचे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. नव्याने उभारण्यात आलेले सबस्टेशन मंगळवारी (ता.४) मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते विधिवत कार्यांन्वित करण्यात आले. याप्रसंगी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.राजेंद्र राठोड, आपली बसचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे आणि विद्युत अभियंता श्री. प्रशांत काळबांडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरीन यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या नेतृत्वात उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक श्री. राजेश भगत यांच्या देखरेखीत ३३केव्ही/०.४३३ केव्हीचे सबस्टेशन हे पहिल्यांदा मनपाच्या विद्युत विभागातर्फे परिपूर्ण करण्यात आले आहे.
शहर बस वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयमार्फत पंतप्रधान ई- बस सेवा योजना देशाअंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नागपूर शहराकरिता १५० ई-बसेस प्राप्त होणार आहेत. यापैकी ७५ बसेस कोराडी डेपो व उर्वरित ७५ बसेस खापरी डेपो येथील वाहन तळावरुन संचालित करण्याचे सुनिश्चित करण्यात आलेले आहे. याकरिता नव्याने उभारण्यात आलेले सबस्टेशन उपयुक्त ठरणार आहे.









