Published On : Thu, Jun 21st, 2018

विश्व कल्याणासाठी शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची गरज – राज्यपाल चे. विद्यासागर राव

Advertisement

मुंबई : व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही आजची सर्वात मोठी गरज आहे. त्यादृष्टीने एक आश्वासक पाऊल म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन व अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेने (आय-एआरटीआयएसटी-आय- आर्टिस्ट) विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांबरोबर काम करावे, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर राजभवन येथे तुलसी महाप्रग्या प्रग्या भारती ट्रस्टच्या (विरार) इंटरनॅशनल अहिंसा रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी (आय-स्मार्ट) या स्वायत्त संस्थेचा शुभारंभ आज राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

योग ही भारतीय संस्कृतीची देणगी असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्वरुपात जगाने योगाला स्वीकारले ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यपाल म्हणाले की, गेल्या चार वर्षात जगातील अनेक देशांमध्ये योगाचा प्रसार झाला. आज न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि इतर अनेक ग्लोबल शहरे आणि जगभरातील सर्व खंडांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे.

श्री. राव यांनी सांगितले, योग ही केवळ शरीर निरोगी ठेवण्यासाठीची व्यायाम पद्धती नसून मन आणि आत्मा यांना एकात्म करणारी जीवन पद्धती आहे. मन: शांती, आत्मिक शांती आणि आत्म-संयम विकसित करणे हे योगाचे अंतिम उद्दिष्ट आहे. आज मानवी समाज हिंसा, तणाव, क्रूरता, लोभ, भ्रष्टाचार, निराशा, शारीरिक व्याधी आदींसारख्या समस्यांना तोंड देत आहे. समाजातील सर्वच व्यक्ती आज तणावाला सामोरे जात आहेत. वैयक्तिक पातळीवर, सामाजिक स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही अशांतता, गोंधळ आणि अस्वस्थता आहे. काही देश युद्ध आणि विनाशाची भाषा करत आहेत. हे पाहता विश्वाला अध्यात्मिक शिकवण देण्याची गरज आहे.

वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरील शांतीच्या अभावाचा विपरित परिणाम जैवसाखळी, पर्यावरण आणि निसर्गावर होत आहे. जीवनशैलीशी संबंधित अनेक आजार हे व्यक्तिगत ताण तणावामुळे होत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जीवन सुखकर झाले असून जग जवळ येत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला या तंत्रज्ञानाची काही नवीन आव्हानेही उभी राहत आहेत, असेही राज्यपाल म्हणाले.

व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर शांती, सुव्यवस्था आणि आनंददायी वातावरणाची पुन:स्थापना करणे हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. मानवतेच्या अंगाने समाजातील आपले स्थान उंचावण्यासाठी आपल्यात सकारात्मक बदल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. ‘आय- आर्टिस्ट’ची स्थापना ही त्यादृष्टीने अत्यंत कालसुसंगत आहे. मुनी महेंद्रकुमारजी हे मानवतेच्या भल्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माचा मिलाफ करणारे अध्यात्मवादी व्यक्तिमत्व आहे, असे गौरवोद्गारही श्री. राव यांनी काढले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्यासाठी आवश्यक भौतिक वस्तूंची निर्मिती करण्याची पद्धती शिकवू शकते. मात्र, मानवतेसाठी या वस्तूंचा उपयोग करण्याचा विवेक आध्यात्मिक सजगतेमुळे येतो. सुदृढ, सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला विज्ञान आणि आध्यात्माचे एकत्रिकरण करायचे आहे असे राज्यपाल म्हणाले.

जगात सर्वात तरुण लोकसंख्या हे आपले बलस्थान असून 2020 पर्यंत भारतीयांचे सरासरी वय 29 वर्षे असेल. अमेरिका किंवा चिनी समाजाच्या सरासरी वयापेक्षा ते 8 वर्षांहून कमी असेल. आपल्याला या युवा शक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सक्षमीकरणासाठी काम करावे लागेल. एक निरोगी समाज आणि सुदृढ राष्ट्र निर्माण करणे हे वैज्ञानिक तसेच तंत्रज्ञानाधारित अध्यात्माच्या माध्यमातून साध्य होईल, असा मला विश्वास आहे, असेही प्रतिपादन श्री. राव यांनी केले.

मुनी महेंद्रकुमारजी म्हणाले, मानव समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आध्यात्मिक तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर उपयुक्त ठरू शकतो. अहिंसा, दया आणि क्षमा ही तत्वेच मानवी समाजाला तारतील. मानवतेचा अंगीकार करणाऱ्या नवीन समाजाच्या निर्मितीसाठी तसेच मानवी मूल्यांची जपणूक करण्यासाठी वैज्ञानिक आध्यात्माचा उपयोग होऊ शकेल. ‘आय-स्मार्ट’ या संस्थेमध्ये व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक विचार, भावना, सकारात्मक वर्तन पद्धती, शारीरिक व मानसिक उपचारांसाठी मानसशास्त्राचा उपयोग आदींचा अभ्यास केला जाणार असून व्यक्तींमधील परस्पर संबंध सौहार्दाचे करण्यासाठीच्या अभ्यासपद्धतीवरही संशोधन केले जाणार आहे.

या कार्यक्रमात मुनी कमल कुमारजी, डॉ. मुनी अभिजीत कुमारजी, प्रताप संचेती आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार मंगल प्रभात लोढा, जैन विश्व भारती संस्थेचे मानद प्राध्यापक मुनी महेंद्र कुमारजी, मुनी कमल कुमारजी, मुनी डॉ. अभिजित कुमार, प्रताप संचेती, डॉ. एस. के. जैन, रवींद्र संघवी आदी या प्रसंगी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement