Published On : Thu, Jun 21st, 2018

योग घराघरांत पोहचविण्याचा मनपाचा मानस : ना. चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागपूर: विश्व योग दिनाचे औचित्य साधून नागपुरात यशवंत स्टेडियमवर मनपातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी उत्साही असतात. योग दिनाची चळवळ वृद्धिंगत करीत नागपुरातील घराघरांत योग पोहचविण्याचा मनपाचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

विश्व योग दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध योगाभ्यासी मंडळ आणि संस्थांच्या सहकार्याने स्थानिक यशवंत स्टेडियम येथे आयोजित योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रजनी दीदी, मनीषा दीदी, एनसीसीचे ग्रुप कमांडर योगेंद्र पै, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, नगरसेविका दिव्या धुरडे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा व आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटनेच्या डॉ. कीर्तिदा अजमेरा, डॉ. सुवर्णा मानेकर, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, प्रदीप पोहाणे, जयप्रकाश गुप्ता, भोजराज डुंबे उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केल्यापासून नागपुरात महापालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी योग दिनाचे मोठे आयोजन होत असते. यानिमित्ताने ‘सुदृढ आरोग्यासाठी योग’ हा संदेश परिणामकारकरीत्या जनतेपर्यंत पोहोचत आहे. नागपुरातील सर्व योग्याभ्यासी मंडळ, ध्यान केंद्र, योग साधना केंद्र यांच्या मदतीने घराघरात आणि मनामनापर्यंत योग पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेतर्फे योग दिनाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होत असते. यामुळे नागपूर शहरात योगविषयी चांगले वातावरण तयार झाले आहे. या आयोजनात सहभागी सर्व संस्थांचे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वागत त्यांनी आयोजनात सहभागाबद्दल सर्व नागपूरकरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले. आभार शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी मानले. कार्यक्रमाला उपायुक्त रवींद्र देतवळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते, संजीवनी प्राणायामचे डॉ. केशव क्षिरसागर, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त महेश धामेचा, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार आदी उपस्थित होते.

विविध संस्थांचा सहभाग

नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध संस्थांचा सहभाग होता. यामध्ये जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हींग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, श्रीरामचंद्र मिशन, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, एन.सी.सी., ईशा फाऊंडेशन, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, नॅचरोपॅथी योग असोशिएशन, सहजयोग ध्यान केंद्र, योगसूत्र, श्रीयोग केंद्र, विवेक बहुजन हिताय संस्था आदींचा समावेश होता. या संस्थांच्या साधकांनी योग प्रात्यक्षिके आणि ध्यान योग केलेत.

तीन वर्षाची बालिका आणि ९३ वर्षांचे आजोबा

योग दिनाच्या निमित्ताने विविध संस्थांच्या साधकांनी योग प्रात्यक्षिके सादर केले. यावेळी श्रद्धानंदपेठ अनाथालयातील श्री योग साधना केंद्राच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकामध्ये तीन वर्षाची बालिका कु. पूजा चोपडे ही सर्वात लहान साधक तर ९३ वर्षांचे आजोबा अबनाशचंद्र खुराणा हे सर्वात वयोवृद्ध साधक होते. या साधकांनी योग प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा संदेश दिला.

‘करु या नियमित योगासनं’

योग दिनाच्या निमित्ताने ठरविण्यात आलेल्या योगासनाच्या नेतृत्वाची धुरा जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाने सांभाळली होती. मंडळाच्या साधकांनी योग दिनाच्या निमित्ताने करावयाची आसने मंचावर करून दाखविली. त्यांच्यासोबत स्टेडियममध्ये उपस्थित हजारो साधकांनी ही सारी आसने केलीत. यावेळी प्रत्येक आसन संपल्यानंतर ‘करु या नियमित योगासनं’ या योग गीताच्या शब्दांनी यशवंत स्टेडियम दुमदुमले होते. प्रसन्न आणि निरामय वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला.

योगमय वातावरण

योग दिनाच्या निमित्ताने सकाळी ६ वाजतापासून यशवंत स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.३० पासून यशवंत स्टेडियमकडे येणाऱ्या साधकांच्या गर्दीने धंतोली परिसरातील रस्ते फुलून गेले होते. यशवंत स्टेडियममध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक साधकाला मनपा आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे दुपट्टा देण्यात येत होता. शुभ्र धवल वस्त्र, भगवा दुपट्टा परिधान केलेल्या आणि एका रांगेत शिस्तबद्ध रीतेने योगा करणाऱ्या साधकांच्या गर्दीने स्टेडियममधील वातावरण योगमय बनले होते.