भारताचे माजी पंतप्रधान,अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्य निधनानंतर देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिगज्जांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
देशाने एक सुसंस्कृत नेता, भारताला आर्थिक अडचणीतून बाहेर काढणारा अर्थमंत्री हरपला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावना व्यक्त केल्या.
तर भारताचे माजी पंतप्रधानडॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ज्ञ गमावला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासीयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपुल लेखनसुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासीयांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. देशाचे अर्थमंत्री म्हणून अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. उच्चशिक्षित सोबतच विनम्र, शालीन व संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना मला अनेकदा त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. ते नेहमी देशाला समोर नेण्याचाच विचार करायचे. हा देश डॉ. मनमोहन सिंग यांना कधीच विसरू शकणार नाही, असे केंद्रीय मंत्री नीती गडकरी म्हणाले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अर्थमंत्री म्हणून देशाप्रतीचे योगदान देश विसरू शकत नाही. त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया होता. त्यांनी देशात आर्थिक क्रांती घडवली. १९९० च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यात त्यांचे मोठे योगदान होते. भारताचे भविष्य घडविणाऱ्या या नेत्याला भारतीय कधीच विसरणार नाहीत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाचे व काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. ते राजकारणात निपुण होते. परंतु कधीच राजकारण्यांसारखे वागत नव्हते. ते देश हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे. विविध विषयांत पारंगत असतानासुद्धा ते कोणताही निर्णय घेताना त्या त्या विषयातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करायचे. ते खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘’सरदार’’ होते. आज एक अत्यंत साधं पण उत्तुंग व्यक्तिमत्त्व देशाने व काँग्रेस पक्षाने गमावले आहे, असे काँग्रेस आमदार विकास ठाकरे म्हणाले.