| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Aug 21st, 2020

  महापालिकेने कोरोनापुढे टेकले गुडघे

  पॉजिटिव्ह रुग्णांना अहवाल देऊन सोडले मोकाट ः सूचनांवर भर, कृती शून्य

  नागपूर ः शहरात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढला असून दररोज हजाराच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहे. वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्याचे प्रशासनाचे सारेच प्रयत्न निष्फळ ठरल्याचे वास्तव आहे. आता पॉजिटिव्ह रुग्णांना अहवाल सोपवून मोकाट सोडले जात असल्याने रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. महापालिका नागरिकांना, विशेषतः पॉजिटिव्ह रुग्णांनाही केवळ सूचना देत आहे किंवा त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचे खोटे आश्वासन देत आहे. एकूणच महापालिकेने कोरोनापुढे गुडघे टेकल्याचे चित्र आहे.

  शहरात कोरोना रुग्णांचा आलेख सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या अठरा हजारापर्यंत पोहोचली. बळीची संख्याही साडेसहाशेवर झाली. सातत्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे मेयो, मेडिकल, एम्स, महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालयातही आता बेड उपलब्ध नाहीत. एकीकडे बेड उपलब्ध नाही तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांना आता घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

  मात्र काही रुग्णांना केवळ पॉजिटिव्ह अहवाल हातात देऊन घरी पाठविले जात आहे. एवढेच नव्हे तर त्यांना ‘महापालिकेची ॲम्बुलन्स घरी येईल, तुम्हाला घेऊन जाईल’ असे खोटे आश्वासनही दिले जात आहे. नुकताच असे प्रकरण लकडगंज झोनमध्ये उघडकीस आले. लकडगंज झोनमध्ये महापालिकेचे तपासणी केंद्रावर एका तरुणाची तपासणी करण्यात आली. त्याला पॉजिटिव्ह अहवाल देऊन घरी पाठविण्यात आले.

  त्याला संपर्कासाठी फोन क्रमांकही उपलब्ध करून दिला. दिलेल्या क्रमांकावर फोन केले असता ॲम्बुलन्स घ्यायला येईल, असे तीन दिवसांपासून सांगण्यात येत असल्याचे या तरुणाने नमुद केले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता खोटारडेपणाचा आधार घेऊन रुग्णांना सांत्वना देणे सुरू केल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या या खोटारडेपणामुळे पॉजिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबात मोठे हाल होत आहे. घरात वृद्धांपासून तर चिमुकल्यांपर्यंत सारेच आहेत. अनेकांकडे मोठे घर नाही. त्यामुळे त्यांना वेगळे राहता येत नसल्याने वृद्ध व चिमुकलेही कोरोनाच्या कवेत येण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण समाजातही वावरत आहेत. त्यामुळे महापालिकेने कोरोना रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.

  उपचारासंबंधीही माहिती नाही
  अनेक पॉजिटिव्ह रुग्ण महापालिकेने घरी पाठविले, परंतु त्यांना उपचारासंबंधी कुठलीही माहिती दिली नाही. उपचारासंबंधी कुठलेही ज्ञान नसल्याने हे रुग्ण बिनधास्त फिरत आहेत. यातील एखादा घरीच दगावला तर जबाबदारी कुणाची? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145