Published On : Fri, Feb 28th, 2020

रंग बदलून चालवत होता मोटारसायकल

– अल्पवयीन वाहन चोराला अटक

नागपूर. गर्लफ्रेंडला फिरविण्यासाठी त्याने मोटारसायकल चोरी केली. रंग बदलून तो ती मोटारसायकल फिरवत होता. यशोधरानगर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली आिण त्याला पकडण्यात आले. आता तो वयात असला तरी ज्यावेळी त्याने वाहन चोरी केले होते तो अल्पवयीन होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे.

समतानगर निवासी संतोष राममनोहर यादव (25) ने 9 नोव्हेंबर 2019 ला रात्री विनोबा भावेनगरात आपली एमएच-49/एस-3747 क्रमांकाची मोटारसायकल उभी केली होती. मध्यरात्रीला अज्ञात आरोपीने त्याची मोटारसायकल चोरी केली. यशोधरानगर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुरुवारी पोलिसांना माहिती मिळाली की, ठाण्यांतर्गत राहणारा एक तरुण कोणताही कामधंदा करीत नसताना सुद्धा महागड्या मोटारसायकलवर फिरतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने संतोषचे वाहन चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई वपोनि डी.एस. साखरे, सपोउपनि विनोद सोलव, प्रकाश काळे, नापोशि मधुकर निखाडे, विजय लांजेवार, आफताब शेख, रत्नाकर कोठे आणि किशोर धोटे यांनी केली.

1661 वाहन चालकांवर कारवाई
वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण 1661 वाहन चालकांवर कारवाई करून 2,84,600 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मुंबई दारूबंदी कायद्यान्वये 5 प्रकरणात 5 आरोपींना अटक करून 8,566 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर जुगार कायद्यान्वये 5 प्रकरणात 12 आरोपींना अटक करून 20,295 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 65 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलिसांतर्फे राबविण्यात आली. या पुढेही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार असून वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रावरून विद्यार्थिनी बेपत्ता
12 वीचा पेपर देण्यासाठी गेलेली 17 वर्षीय विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावरून अचानक बेपत्ता झाली. या प्रकरणी सदर पोलिसांनी विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 10.50 वाजताच्या सुमारास आईने मुलीला सदर हद्दीतील एका परीक्षा केंद्रावर सोडले. दुपारी 2 वाजता पेपर सुटल्यावर जेव्हा आई तिला घेण्यासाठी आली, तेव्हा मुलगी कुठे ही दिसली नाही. आईने तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

ऑटोमध्ये महिलेची चेन लंपास
ऑटो चालक आणि महिला चोरांच्या टोळीने एका महिलेच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन लंपास केली. या प्रकरणी पोलिसांनी नुरी कॉलनी, नारा रोड निवासी फिरोजाबेगम इकबाल खान (56) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

फिरोजाबेगम बुधवारी दुपारी उपचारासाठी मोमिनपुरा येथे गेल्या होत्या. परत घरी जाण्यासाठी ऑटोमध्ये बसल्या. ऑटोमध्ये आधीपासूनच 3 महिला बसल्या होत्या. एका महिलेने उलटीचे नाटक केले. इंदोरा मैदानाजवळ ऑटो चालकाने वाहन थांबविले आणि सर्वांना उतरण्यास सांगितले. या दरम्यान महिला चोरांनी फिरोजाबेगम यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली. त्यांना तेथे सोडून ऑटो चालक फरार झाला. काही वेळानंतर फिरोजाबेगम यांना चेन चोरी झाल्याचे समजले. त्यांनी जरीपटका पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहात आहेत.

गळफास लावून आत्महत्या
मानकापूर ठाण्यांतर्गत एका व्यक्तीने राहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मृतक आराधना हाऊसिंग सोसायटी, गोधनी रोड निवासी मोहित प्रकाश शेळके (31) आहे.

मोहिती ईलेक्टि्रशियनचे काम करीत होता. बुधवारी सायंकाळी माेहितची पत्नी काही कामाने बाहेर गेली होती. शहर पोलिसातून एएसआय पदावरून सेवानिवृत्त झालेले मोहितचे वडील प्रकाश बाहेर काम करीत होते. सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास मोहितने घराचे दार आतून बंद केले.

स्वयंपाकखोलीमध्ये छताच्या पंख्याला दुपट्टा बांधून गळफास लावला. बराच वेळपासून दार बंद असल्यामुळे वडिलांनी मोहितला आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता मोहित गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पत्नी घरी परतली असता तिच्या पायाखालून वाळूच सरकली. मोहितला लहान मुलगा आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.